मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरिता समाज जागृतीसाठी मनोज जरांगे पाटील सध्या शांतता रॅलीच्या माध्यमातून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी (ता. 9)ही रॅली लातूर जिल्ह्यात होती. दरम्यान मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला संबोधित करताना भारतीय जनता पक्षाचे नेते, मंत्री गिरीश महाजन यांना इशारा दिला आहे.
विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. त्या अनुषंगाने बोलताना जरांगे यांनी गिरीश महाजन यांना उद्देशून म्हटलं की, “तुमच्या एक लक्षात येत नाही. जामनेर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 36 हजार कुणबी मराठ्यांचं मतदान आहे”, “गिरीश महाजन साहेब, तुम्ही कितीही डाव टाका. मी सुद्धा आरक्षणातला बाप आहे आणि जातवान क्षत्रिय मराठा आहे.
तुम्हाला मंत्रिपद मिळालं तर तुम्ही उड्या काय मारायला लागले, तुमच्या डोक्यात हवा घुसली, मंत्रिपदाची मस्ती घुसली. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात नाही, जामनेरमध्ये 1 लाख 36 हजार कुणबी मराठ्यांचं मतदान आहे. ते शेवटी मराठे आहेत. आम्ही तुमच्यासुद्धा धुऱ्यावर आक्रमण करु शकतो”, असा इशारा मनोज जरांगे यांनी गिरीश महाजन यांना दिला.
धनंजय मुंडेंवरही जातीवादाचा आरोप
बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर मनोज जरांगे यांनी जातीवादाचा आरोप केला आहे. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून बीडच्या पालकमंत्र्यांनी एसपींना सांगून तिथली परवानगी रद्द केली. तरीही मी सांगतो, बीडची रॅली शांततेत बीडमध्ये होणार. बीडच्या पालकमंत्र्यांना असा जातीवाद शोभत नाही”, अशी टीका मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे.
अकलेचं दुकानच बंद होतं का?
मनोज जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अतीशय टोकाची टीका केली. “अरे तुझी आणि अक्कलेची केव्हा भेट झाली होती की नाही? की तेव्हा अक्कल वाटताना अकलेचं दुकानच बंद होतं का? ते बधिर डोक्याचंच आहे. काय करावं याचीदेखील अक्कल पाहिजे”, अशा खोचक शब्दांत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. मागच्या काही महिन्यांत जरांगे यांनी मंत्री भुजबळ यांच्यावर खालच्या पातळीतील आरोप आणि अर्वाच्य भाषेत टीका केली आहे. आता या टीकांनीही टोक गाठल्याचं दिसतंय.