वन विभागाचे मांडवी वनपरिक्षेत्र कार्यालय वनजमीन लुटणाऱ्या माफियांचा अड्डा बनला आहे. तुंगारेश्वर अभयारण्याच्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये असलेल्या राखीव व संरक्षित वनाच्या वनजमिनी मांडवी वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे अतिक्रमित झाल्या आहेत. या वनजमिनी वाचविण्यासाठी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
तुंगारेश्वर अभयारण्याच्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचे जीवन बाधित करणारे कारखाने आणि अवैध बांधकामे होत आहेत. रोज शेकडो स्क्वेअर फुटांची वनजमीन मांडवी वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात अतिक्रमण बाधित होत आहे. येथील वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनरक्षक यांच्याकडून आर्थिक देवाणघेवाण करुन राखीव वनाची, संरक्षित वनाची वनजमीन लुटणाऱ्या माफियांकडून दर महिन्याला लाखो रुपयांचे हप्ते घेऊन त्यांना संरक्षण दिले जात आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
चंद्रपाडा येथे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यकाळात संगनमताच्या धोरणामुळे आणि चुकीच्या कार्यपद्धतीमुळे वनजमिनीवरील अतिक्रमणामध्ये उघडपणे व्यवसाय सुरु आहे. मौजे कण्हेर येथील संरक्षित वनाच्या जमिनीमध्ये आलिशान बंगल्यांची निर्मिती झाली आहे. त्या अवैध बांधकामास वन विभागाचे अधिकारी संरक्षण देत आहेत. सध्या इको सेन्सिटीव्ह झोनमध्ये बेकायदा बांधकामाची आणि प्रदूषणकारी कारखान्यांची नेमकी काय स्थिती आहे, याचा तपशिल वनमंत्र्यांनी संकलित केला तर अत्यंत भयावह सत्य उघडकीस येईल, असेही वडेट्टीवार म्हणाले.
वन जमिनीवरील अवैध बांधकामांमुळे थेट तुंगारेश्वर अभयारण्याचे वन्य जीवांचे क्षेत्र बाधित होत असल्याने, याबाबत सखोल चौकशी करुन मांडवी वनपरिक्षेत्रात सुरु असलेले अवैध बांधकामे तात्काळ निष्काषित करावी, या अवैध बांधकामास संरक्षण देणाऱ्या दोषी अधिकारी/ कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.