या लेखात प्रकाशित झालेली मते ही लेखकांची आहे. या मतांशी द लोकहित सहमत असेलच असे नाही.
Political Battel : महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने केलेल्या विकास कामांच्या बळावर पुन्हा राज्यात सरकार येईल, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. षण्मुखानंद सभागृहात झालेल्या महायुतीच्या महामेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना ‘एकजूटीने लढू या, एकजुटीने जिंकू या’ असा यशाचा मंत्र दिला. निवडणूक होईपर्यंत ‘महायुतीचा विजय असो’ हिच आपली घोषणा राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावेळी महायुतीच्या नेत्यांचे आणि अनावश्यक वक्तव्य करून वाद निर्माण करणाऱ्या प्रवक्त्यांचे कान टोचले.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लोकसभा निवडणुकीत समन्वयाच्या अभावाने महायुतीला फटका बसल्याचे निरीक्षण नोंदविले. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) झालेल्या पराभवानंतर मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात महायुतीचा मेळावा झाला. पराभवास कोणत्या बाबी कारणीभूत ठरल्या, यावर चर्चा झाली. झालेल्या चुका सुधारून आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी केला. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ नेते नारायण राणे, छगन भुजबळ, आशिष शेलार यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते.
गाफील राहू नका
‘डबल इंजिन’ असताना लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मुसंडी मारली. एकदा आपल्याला मार बसला आहे. आता गाफील राहू नका, ताकही फुंकून प्या, असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. महाविकास आघाडीचे सरकार फेसबुकवर (Facebook) चालणारे सरकार होते. या सरकारमध्ये मुख्य असलेले मंत्रीच मंत्रालयात येत नव्हते. सगळे काही ‘वर्क फ्रॉम होम’चे (Work From Home) सुरू होते. आपले सरकार ‘फेस टू फेस’ सरकार आहे. जनतेचे कल्याण हेच महायुती सरकारचे ब्रिद आहे. आपले सरकार सर्वसामान्यांचे , कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून नमूद केले.
आपल्या सरकारने समाजातील सर्व घटकांसाठी योजना राबविल्या. अर्थसंकल्पात महिला तसेच कामगारांच्या हितासाठी महत्वाच्या योजना जाहीर केल्या. या योजना पाहिल्यानंतर विरोधकांचे चेहरे पांढरेफटक पडले आहेत. ते आता अपप्रचार करीत आहेत, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि सरकारने केलेल्या विकास कामांच्या बळावर महायुतीचाच विजय होईल आणि जाहीर करण्यात आलेल्या योजना पुढेही सुरुच राहतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला, तरी आता आपण मैदानात आहोत. आपण निर्धार केला तर महायुती विधानसभेच्या दोनशे जागा जिंकेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. केवळ दोन लाख अतिरिक्त मतांमुळे महाविकास आघाडी 30 जागा जिंकली. सुत्रबद्ध पद्धतीने प्रयत्न केल्यास तसेच 20 लाख मतदान मिळाल्यास महायुतीला विधानसभा निवडणुकीत 200 जागा सहज मिळतील, असा ‘फार्मूला’ही फडणवीस यांनी सांगितला
व्यापक लढा द्या
लोकसभा निवडणुकीत आपला लढा महाविकास आघाडीतल फक्त तीन पक्षांशी नव्हता. या निवडणुकीत खोट्या प्रचाराचा फटका बसला. विरोधक खोटे बोलत राहिले. आपण गाफील राहिलो. आपल्याला जनतेसमोर चांगले मांडावे लागेल. महायुतीच्या सर्वांनी एकजुटीने विरोधकांचे प्रयत्न, मनसुबे हाणून पाडावे लागतील, असे देवेंद्र यांनी सांगितले. महायुतीमधील सर्वच नेत्यांना आता तडजोडीचे महत्व पटले आहे. तडजोड केली तरच युती टिकते, असे स्पष्ट मत त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी नोंदविले. महायुती म्हणून आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. तीन पक्ष म्हटले की, प्रत्येकाच्या आशा अपेक्षा असतात. त्यामुळे योग्य तडजोड करून पुढे जायला हवे, फडणवीस स्पष्टच बोलले.
तिन्ही पक्ष एकत्रित
निवडणुकीत जागा वाटपाचा निर्णय आता तीनही पक्षाचे नेते एकत्र बसून करणार आहेत. आपल्याला एकत्र राहून जिंकण्याचा निर्धार करून पुढे जायचे आहे. अटलजी बिहारी वाजपेयी यांचे ‘कदम मिलाकर चलना होगा’ ही कविता त्यामुळेच फडणवीस यांनी यावेळी सादर केली. एकीचे महत्व त्यांनी विषद केले. शेखचिल्लीचे मार्मिक उदाहरण दिले. स्वतःचे पहाल तर विश्वासघात होईल. शेखचिल्ली प्रमाणे ज्या फांदीवर बसलो, तीच फांदी कापत बसलो तर अवघड होईल, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.समन्वय साधणार
महायुतीमधील समन्वयाच्या अभावाने लोकसभा निवडणुकीत यश मिळाले नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. विभाग, जिल्हा, तालुकानिहाय समन्वय साधावा लागेल असे त्यांनी नमूद केले. यापूर्वी तसे झाले नाही. आपण समन्वय राखण्यात कमी पडलो, असे ते म्हणाले. सरकारच्या चांगल्या योजनांबाबत विरोधक गैरसमज पसरवित आहेत. हा गैरसमज दूर करावाच लागेल. ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ती सर्वांना पार पाडायची आहे. तीनही पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जावे.
IPS Transfer : नागपूर सहपोलिस आयुक्त अस्वती दोरजे यांची बदली
महायुतीने जनसामान्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना आणल्या आहेत. महिलांसाठी चांगल्या योजना आणल्या आहेत. या योजना पुढे सुरू ठेवायच्या असतील तर महायुतीचे सरकार येणे गरजेचे आहे, हे लोकांच्या मनावर बिंबवा, असे पवार यांनी सांगितले.
आपण फक्त दोन दिवस मंत्रालयात थांबणार आहोत. उर्वरित दिवस पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे, असे अजित पवार यांनी जाहीर केले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत दादा ‘फ्रंटफूट’वर दिसतील यात शंकाच नाही. षण्मुखानंद सभागृहातील मेळाव्यामुळे नेते, कार्यकर्त्यांमध्ये चेतना, उत्साह जागविण्याचे कार्य झाले आहे. मात्र निवडणूक केवळ भाषणाचे ‘डोस’ पाजून जिंकता येत नाहीत.
नवनवीन आव्हाने दररोज समोर येतात. आरक्षणाचा मुद्दा अजूनही सुटलेला नाही. विविध मागण्यांसाठी आंदोलन करणारी मंडळी दबावतंत्राचा वापर करीत आहे. पाडापाडीच्या वल्गना केल्या जात आहेत. या सर्व बाबींचा मतदानावर परिणाम होऊ शकतो. ही शक्यता नाकारता येत नाही. अपप्रचाराचा धोका वाढत आहे.
आव्हानात्मक अनेक परिस्थितीला सामोरे जाऊन निवडणूक जिंकणे सोपे राहिलेले नाही. राज्यातील सत्ता आपल्या ताब्यात राहावी, यासाठी महायुतीला अधिक जोमाने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागणार आहेत, हे नक्कीच.