Terror Attack : अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील शहिद जवान प्रवीण जंजाळ यांना काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील चिन्नीगाम येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आले. जंजाळ यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. आठ) मोरगाव भाकरे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. राजशिष्टाचारानुसार व बंदुकीच्या फैरी झाडत जंजाळ यांना मानवंदना देण्यात आली. (Gun Salute) प्रवीण जंजाळ यांचे पार्थिव सैन्यदलाच्या तुकडीकडून मूळ गावी आणण्यात आले. सैन्य दलाची तुकडी, पोलिस विभागाच्यावतीने त्यांना मानवंदना देण्यात आली.
अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे, अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे, बाळापूरचे आमदार नितीन देशमुख, जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे, जिल्हा परिषद अध्यक्ष संगिता अढाऊ, उपविभागीय अधिकारी (SDO) डॉ. शरद जावळे, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्यासह सैन्यदलाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी पुष्पचक्र अर्पण करून जंजाळ यांना श्रद्धांजली वाहिली. ‘शहिद प्रवीण जंजाळ अमर रहे’च्या घोषणांनी परिसर निनादला.
सैनिकांचे गाव शोकसागरात
सैनिकांचे गाव म्हणून मोरगांव भाकरेची ओळख आहे. येथे आजवर 90 युवक सैन्यात भरती झालेले आहेत. शहीद जवान प्रविण जंजाळ हे देखील याच गावातील आहेत. जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवादी आणि सैन्यात चकमक झाली. अतिरेक्यांनी यावेळी सैनिकांवर बेछूट हल्ला केला. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले. दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती सैन्याला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली. यात प्रविण जंजाळ शहीद झालेत. मुलगा देशासाठी शहीद झाल्याचा अभिमान असल्याची भावना त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.
2020 मध्ये प्रवीण जंजाळ हे भारतीय सैन्य दलात दाखल झालेत. भरतीनंतर त्यांची पोस्टिंग मणिपूरमध्ये होती. पण चार महिन्यांपूर्वी सैन्य दलाच्या राष्ट्रीय रायफलच्या क्रमांक एकच्या तुकडीत त्यांना कुलगाम जिल्ह्यात पाठविण्यात आले होते. त्यांच्या लग्नाला नुकतेच एक वर्ष झाले होते. त्यांच्या मृत्यूच्या पश्चात पत्नी शाममाला, आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे. प्रवीण जंजाळ चार महिन्यांपूर्वीच गावी सुटीवर आले होते. प्रवीण यांची ही कुटुंबासोबतची शेवटची भेट ठरली.
प्रवीण यांचे प्राथमिक शिक्षण गावात झाले. बारावीपर्यंतचे शिक्षण गायगाव येथे झाले. त्यांच्या मित्रांनी प्रवीण यांच्या गावातील शेवटच्या भेटीतील आठवणींनी रात्र जागून काढली. विशेष म्हणजे प्रवीण यांनी घटनेच्या दिवशी म्हणजे काही वेळापूर्वी आपल्या वडिलांना घराच्या बांधकामसाठी 39 हजार रुपये पाठवले होते. प्रवीण हे सैन्यदलात दाखल झालेले जंजाळ कुटुंबातील तिसरे व्यक्ती होते. जंजाळ परिवारातून भास्कर बाजीराव जंजाळ, रवींद्र जंजाळ हे देखील सैन्यदलात होते. भास्कर जंजाळ यांचे चार वर्षांपूर्वी हृदविकाराने निधन झाले होते.