Prakash Anna Shendge : राज्यात सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलन सुरू आहे. यावर ओबीसी नेते जरांगे पाटील यांच्या विरोधात प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देऊ नये, यासाठी विरोध करण्यात येत आहे. ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी रविवारी (ता. सात) अकोल्यात यासंदर्भात बैठक घेतली. त्यांनी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) उमेदवार देण्याची घोषणा केली आहे.
बिहारमध्ये (Bihar) ओबीसी जनगणना झाली. त्यामुळे तेथे ओबीसींची वास्तविक परिस्थिती कळली. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे. संविधानात ओबीसींना 27 टक्के आरक्षण दिले गेले आहे. या 27 टक्के आरक्षणात मध्ये मनोज जरांगे यांच्यामार्फत मराठा समाज शिरविण्याचा प्रयत्न होत आहे. राज्य सरकार त्यांचे लाड पुरवित आहे. सरकारने मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिल्यास ओबीसी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतील, असा इशारा शेंडगे यांनी दिला.
न्यायालयीन लढा कायम
ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी न्यायालयीन लढाई सुरू आहे. राजकीय मार्गाने आरक्षण रक्षणासाठी ओबीसी बहुजन पार्टी स्थापन झाली आहे. ही पार्टी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण 288 जागा लढविणार आहे. त्याची संपूर्ण तयारी पार्टीने केली आहे, असे ते म्हणाले.
प्रकाश अण्णा शेंडगे यांनी अकोल्यात (Akola) ओबीसी बहुजन पार्टीची अमरावती विभागीय बैठक घेतली. त्यांनी पार्टीच्या कामाचा आढावा घेतला. बैठकीत एकूण सात ठराव पारित करण्यात आलेत.
अलीकडेच देशात लोकसभेच्या निवडणूक (Lok Sabha) आटोपली आहे. पुढील तीन महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला धोका निर्माण होत आहे. ओबीसींच्या अस्मितेचा, अस्तित्वाचा व आरक्षणाचा प्रश्र निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी जनमोर्चा या सामाजिक संघटनेतून ओबीसी बहुजन पार्टींचा उदय झाल्याची माहिती शेंडगे यांनी यावेळी दिली.
ओबीसी बहुजन पार्टी विदर्भामध्ये असलेल्या सर्व 62 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार आहे. ओबीसी बहुजन पार्टीचे उपाध्यक्ष प्रा. टी. पी. मुंडे, राष्ट्रीय महासचिव चंद्रकांत बावकर , कोषाध्यक्ष जी. डी तांडेल, व्हि. डी काळे, अनिल शिंदे, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गोरे (गोबरे), माजी आमदार तुकाराम बिरकड, डॉ. अशोक ओळंबे, माजी आमदार नारायण गव्हाणकर, जयंत म्हसने, अमरावती विभागीय अध्यक्ष सुभाष सातव, अमरावती जिल्हाध्यक्ष प्रवीण पेटकर, ओबीसी जनमोर्चा अकोलाचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे , महिला जिल्हाध्यक्ष सुनिता सरोदे , माया इरतकर, ओबीसी बहुजन पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड. दाते, अकोला महिला जिल्हाध्यक्ष मीना कवडे उपस्थित होते.
शेंडगे यांच्या पत्रकार परिषद व बैठकीला अकोल्यातील मोठ्या राजकीय पक्षांचे नेते उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यात भाजपच्या (BJP) काही पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे ओबीसी बहुजन पार्टीमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाला फायदा व कोणाला नुकसान होणार, यासंदर्भात राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.