Stand Of BJP : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा ते शेगांव हा 109 किलोमीटरचा भक्तीमार्ग तयार होत आहे. या भक्तीमार्गाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन करून विरोध केला आहे. भक्तीमार्ग रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या भक्तीमार्गाला शेतकऱ्यांचा नकार असला, तर भक्तीमार्ग होणार नाही असे सूतोवाच भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे यांनी रविवारी (ता. सात) केले. समृद्धी महामार्गाला सुरुवातीला दीड वर्ष असाच विरोध होता. मात्र जेव्हा शेतकऱ्यांची बैठक घेवून त्यांना समजाविण्यात आले, त्यांच्या मोबदल्याबद्दल बोलण्यात आले, त्यांची अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या त्यानंतर समृद्धी महामार्गाचा विरोध मावळला, असेही ते म्हणाले.
भाजपचे नेते तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी रविवारी बुलढाणा येथील पत्रकार भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. डॉ. कुटे म्हणाले, राज्यातील माता-भगिनींना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना प्रत्यक्षात आणली आहे. नुकताच सादर झालेल्या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, व युवकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. राज्याचा हा अंतरिम अर्थसंकल्प सर्वव्यापी, सर्वस्पर्शी आहे. सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहे. विजया राठी, सिद्धार्थ शर्मा, राजेश्वर उबरहंडे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
महिलांना दिलासा
आमदार कुटे म्हणाले, संपूर्ण राज्यात लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला या योजनेच्या अर्ज प्रक्रियेत भगिनींना मोठी अडचण निर्माण झाली होती. लहानमोठ्या कागदपत्रांसाठी त्यांची दमछाक झाल्याचे दिसून आले. हे लक्षात येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेच्या अटींमध्ये योग्य ते बदल केले. काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. यामुळे राज्यभरातील भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकाराला वर्षाला 46 हजार कोटी रुपये लागणार आहे. ज्या अटी अडचणीच्या ठरतील यावर देखील निश्चितपणे बदल होणार आहे.
पात्र ठरणाऱ्या प्रत्येक महिलेपर्यंत ही योजना पोहोचविल्या जाणार आहे. या योजनेशिवाय राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात तरुण, शेतकरी, महिला यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प लोककल्याणकारी ठरणार असल्याचे आमदार कुटे म्हणाले. महिलांना एसटी महामंडळ मध्ये 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. एसटी महामंडळ (MSRTC) तोट्याकडून नफ्याकडे जात आहे. आतापर्यंत चार हजार कोटी रुपयांचा विमा वितरित झाला आहे. आणखी तीन हजार कोटी रुपयांचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
तरुणांना प्राधान्य
दहा लाख तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधीत दहा हजार रुपये दरमहा अनुदान देण्याचा निर्णयदेखील शासनाने घेतला आहे. महिलांचे बचत गट सुरू झाल्यानंतर आधी 15 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळायचे. आता त्यात आणखी 15 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. खेळते भांडवल म्हणून आता 30 हजार रुपये मिळणार आहेत. याशिवाय महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी तालुका केंद्रावर विक्री केंद्र सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
सिंचनाच्या (Irrigation) माध्यमातून शेतकऱ्यांना समृद्ध करत शाश्वत शेतीकडे नेण्यात येत आहे. यासाठीसुद्धा राज्य शासन प्रयत्नशील आहे, असेही डॉ. संजय कुटे म्हणाले.
बुलढाणा शहराला शहराध्यक्ष नाही. मेहकर तालुक्यातही संघटनात्मक पातळीवर वाद आहेत. याबाबत डॉ. कुटे म्हणाले, भाजप हा कार्यकर्ता आधारित पक्ष आहे. नेते असो किंवा नसो कार्यकर्ता म्हणजे भाजप आहे.
BHEL Project : खटाईत पडले ‘भेल’; शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha) भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही, हे मान्य करीत कुटे म्हणाले, एक खोटा ‘नॅरीटिव्ह’ सेट करण्याचा प्रयत्न झाला. भाजप सत्तेत आल्यास संविधान बदलले जाईल असा अपप्रचार झाला. याला उत्तर देण्यात आम्ही कदाचित कमी पडलो, असे ते म्हणाले. एखादा ‘नॅरेटिव्ह’ एकाच निवडणुकीत चालतो. त्यामुळे पुढचा काळ आमचाच आहे असेही डॉ. कुटे म्हणाले.