महाराष्ट्र

Bacchu Kadu : आपला भिडू होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री

Prahar Janshakti Party : उमरखेड शहरात लागले बच्चू कडूंच्या नावाचे पोस्टर्स

Yavatmal Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रिपदासाठी अनेक चेहरे व नावे चर्चेत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदासाठी दावेदार असणाऱ्या अनेक नेत्यांच्या नावाने सध्या राज्यात बॅनर झळकत आहेत. यात आणखी एका नेत्याची भर पडली आहे. या नेत्याचे नाव आहे प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांची. बच्चू कडू यांच्या नावाने यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे ‘भावी मुख्यमंत्री’ अशा आशयाचे बॅनर झळकले आहे. 

राज्यातील दोन्ही शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी नेत्यांची नावे ठरवून टाकली आहे. एका शिवसेनेला एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री हवे आहेत. दुसऱ्या शिवसेनेने उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील असा दावा केला आहे. लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत काँग्रेसने महाराष्ट्रात मुसंडी मारली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या नावाने भावी मुख्यमंत्री आशयाचे बॅनर अनेक ठिकाणी झळकले. महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार (Ajit Pawar) हेच मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्यांची संख्या वाढतच आहे.

भाऊंची एन्ट्री

मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे. हे नाव आहे बच्चू कडू यांचे. बच्चू कडू यांच्या वाढदिवसानिमित्त उमरखेड शहरात बॅनर उभारण्यात आलेत. या बॅनरवर आमदार कडू यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. प्रहार जनशक्ती पार्टीचे उमरखेड शहर प्रमुख राहुल मोहितवार यांनी हे बॅनर लावले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले बच्चू कडू हे अपक्ष आमदार आहेत. सध्या ते राज्य सरकावर नाराज आहेत.

महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून त्यांची नाराजी कायम आहे. मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज होते. त्यानंतर सरकारने त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल केला. त्यानंतरही बच्चू कडू यांची नाराजी कायम होती. मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाच्या वेळीही त्यांनी सरकारच्या विरोधात रोखठोक भूमिका घेतली होती.

Ajit Pawar : व्हिडीओच्या माध्यमातून दादांची ‘मनकी बात’

अमरावती लोकसभा निवडणुकीत भाजपने नवनीत राणा यांना उमदेवारी दिली. त्यामुळे त्यांनी उघडच बंड केले. राज्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातही (Maharashtra Assembly Monsoon Session) बच्चू कडू यांनी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली.

वाटचालीवर लक्ष

महायुती सरकारमध्ये असूनही नाराज असलेले बच्चू कडू नाराजच आहे. अशात त्यांच्या नावाने भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. बच्चू कडू आता कोणती भूमिका घेतात, भविष्यातील त्यांची राजकीय वाटचाल काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीतून बच्चू कडू बाहेर पडल्यास ते महाविकास आघाडीत सहभागी होऊ शकतात. परंतु त्यांच्याकडे असलेले आमदारांचे संख्याबळ पाहता ते भावी मुख्यमंत्री होतील की नाही, यासंदर्भात साशंकताच आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!