Chandrapur News : आपल्याच बहिणींसाठी असलेल्या योजनेचे नाव ‘ लाडक्या ताई’साठी चोरल्याचा प्रकार चंद्रपुरात घडला आहे. या ताई दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आहेत. चंद्रपुरातील दिग्गज आणि पक्षात अत्यंत ज्येष्ठ असलेल्या नेत्यांना दुधातील माशीसारखे बाजूला काढत काँग्रेसने प्रतिभाताईंना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली. निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळावा, यासाठी सगळ्या मार्गांचा अवलंब केला. त्यात त्यांना यश मिळाले अन् प्रतिभाताई खासदार झाल्या.
ताई खासदार झाल्याचे सुख कदाचित त्यांच्या जवळ असलेल्यांपैकीच काहींना पाहावेनासे झाले आहे, असेच आता काही घटनांवरून म्हणावे लागेल. खासदार झाल्यानंतर धानोरकर यांनी लोकसभेत शपथही घेतली नव्हती तत्पूर्वीच त्यांच्या भावाने आपणच खासदार असल्याच्या आविर्भावात आपली प्रतिभा दाखविली. प्रचंड शिवीगाळ करीत कर्नाटक एम्टाच्या अधिकाऱ्यांना चक्क ताईंच्या लाडक्या दादाने मारहाण केली. दादाने केलेल्या या कृत्यामुळे टीकेचे बोट उठले ते ताईंकडे. आजपर्यंत ताईंनी कधीही असा प्रकार खपवून घेतला नाही. कोणालाही आवडणार नाही, अशीच ही घटना होती.
हा अतिउत्साही कोण?
कर्नाटक एम्टाच्या अधिकाऱ्यांच्या मारहाणीची घटना ताजी असतानाच पुन्हा एका अतिउत्साही कार्यकर्त्याने नवा प्रताप केला आहे. राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडताना महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर केली. या योजनेला मंगळवारपासून (ता. दोन) राज्यात सुरुवात झाली. मात्र ताईंच्या एका कार्यकर्त्याने चक्क त्यांच्याच लाडक्या बहिणींसाठी असलेल्या योजनेचे नावच चोरून टाकले. मुख्यमंत्री लाडकी बहिण असे लिहिण्याऐवजी त्याने भलतेच कृत्य केले. ‘प्रतिभा धानोरकर लाडकी बहिण योजना’ असे नाव देत एकाने पोस्ट व्हायरल केली आहे.
पोस्ट व्हायरल करणाऱ्या व्यक्तीचे नाव धम्मा निमगडे असल्याचा आरोप भाजपने केला आहे. निमगडे यांच्या मोबाइल क्रमांकासह भाजपने या प्रकाराची पोलिसांकडे तक्रार केली आहे. शासकीय योजनेचे नाव बदलून हा प्रचार करण्यात आला आहे. त्यामुळे महिलांची दिशाभूल करण्यात आली आहे.
परिणामी याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी आता भाजपकडून करण्यात आली आहे. भाजपच्या महिला प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, सुलभा पीपर, सुनिता मोकलवार, आकाशी गेडाम, रोहिणी ढोले, नंदा कोटरंगे, वैशाली वासलवार यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे.
अरे त्यांचा सुचू तर द्या
प्रतिभा धानोरकर यांच्या भोवती असलेला गोतावळाच त्या अडचणीत सापडाव्या असे कृत्य का करताहेत, असा प्रश्नच अनेकांना पडला आहे. आधीच भावाने केलेल्या शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणावरून लोकांमध्ये धानोरकर यांच्याबद्दल चुकीचा संदेश गेला आहे. आमदार असताना आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा धानोरकर यांनी कोणताही विकास केला नाही, अशी टीका त्यांच्यावर आजही होते. भाजपने तर त्यांना निवडणूक प्रचारादरम्यान थेट केलेल्या विकास कामांची यादीच दाखवा असे आव्हान दिले होते. लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना मतदारांना कौल दिला आहे.
Maharashtra Budget : दादांच्या पोटलीतून ‘सीएम लाडकी बहिण योजना’
त्यामुळे त्यांना काही तरी करून दाखविण्याची एक संधी मिळाली आहे. अशात शिवीगाळ, अधिकाऱ्यांना मारहाण आणि आता योजनेच्या नावा सोबत खोडसाळपणाची घटना घडली आहे. त्यामुळे ताईंच्या जवळच्या लोकांनाच आता बाकीच्यांकडून अरे त्यांना काही सुचू तर द्या, असा सल्ला देण्याची वेळ आली आहे.