महाराष्ट्र

Monsoon Session : मनोज जरांगेंवर ड्रोन कॅमेऱ्याची पाळत

Maharashtra Assembly : वडेट्टीवार यांनी दिली सभागृहाला माहिती 

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पाळत ठेवली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी 2 जुलै रोजी सभागृहात ही माहिती दिली आहे. मनोज जरांगे पाटील हे सध्या अंतरवाली सराटी गावातील सरपंचांच्या घरी राहत आहेत. 1 जुलै सोमवारी मध्यरात्री  मनोज जरांगे यांचा मुक्काम असलेल्या घरावर एक ड्रोन घिरट्या घालत असल्याचे दिसून आले. मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळ आणि ते राहत असलेल्या घराची ड्रोनद्वारे टेहळणी सुरू असल्याची आहे. याप्रकारामुळे अंतरवाली सराटीच्या ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत स्थानिक पोलिस प्रशासनामार्फत माहिती घेऊन सभागृहाला देण्यात येईल, असं म्हटलं आहे.

दिली होती मुदत

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सगेसोयऱ्यांच्या व्याख्येत बसणारे आणि ओबीसी प्रवर्गातून (OBC) आरक्षण देण्यासाठी 8 जूनपासून आंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले होते. त्यावेळी सरकारी शिष्टमंडळाने सगेसोयऱ्यांच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 13 जुलै पर्यंतची मुदत देत आमरण उपोषण स्थगित केले होते.

जरांगे यांनी दिलेली मुदत संपायला आता अवघे 12 दिवस शिल्लक राहिले आहेत. असे असतानाच आता मनोज जरांगे पाटील राहत असलेल्या घराभोवती ड्रोन फिरत होता. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी स्वत:गच्चीवर जाऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी सहकाऱ्यांशी चर्चाही केली. या प्रकाराबद्दल अंतरवाली सराटीचे सरपंच आणि ग्रामस्थांनी पोलिसांना तोंडी तक्रार दिली आहे. आता पोलिस घटनास्थळी येऊन पाहणी करण्याची शक्यता आहे. चार दिवसांपूर्वीच अंतरवाली सराटीत अशाचप्रकारे ड्रोन घिरट्या घालताना दिसून आला होता. यानंतर आता हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात ही मांडण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी 2 जुलै रोजी सभागृहात हा विषय मांडला.

Monsoon Session : दीक्षाभूमीच्या मुद्द्यावरून विधानसभेत वडेट्टीवार आक्रमक

जरांगेंना धोका

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या घरावर ड्रोन टेहळणी (Drown Camera) करीत असल्याची माहिती दिली. जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका आहे का? अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं. मराठा आंदोलनामुळे अंतरवली सराटी हे गाव केंद्रस्थानी आलेलं आहे. त्यामुळे या प्रकारामागे नेमकं कोण आहे? हे प्रकरण गांभीर्याने घेण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. आंदोलनामुळे हे टेहळणी होत असेल, तर हे गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून निवेदन सादर करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, “स्थानिक प्रशासनाकडून अहवाल प्राप्त करून माहिती सभागृहाला दिली जाईल. यापूर्वीच जरांगे यांना संरक्षण देण्यात आलेले आहे. अधिक संरक्षण देण्याची गरज असल्यास जालन्यातील पोलिस अध्यक्षांसोबत चर्चा केली जाईल”.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!