Beed : बीड येथील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने 29 जून शुक्रवारी रात्री जामखेडनजीक अटक केली. त्यानंतर खांडेंची पक्षाकडून हकालपट्टी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्याच पक्षाच्या जिल्हा प्रमुखावर केलेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. या कारवाईला शिंदे गटातीलच दोन नेत्यांमधील अंतर्गत वादाची पार्श्वभूमी आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे यांना धोका देणे खांडे यांना भोवल्याचे दिसून येत आहे. या कारवाई पाठोपाठ शिवसेनेने त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आल्याने बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
शिवसेना सचिव संजय मोरे म्हणाले की, कुंडलिक खांडे आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते शिवराज बांगर यांच्यातील संवादाची कथित ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव झाला आहे. महाराष्ट्रात लोकसभेला कमी जागा मिळाल्यानंतर महायुतीत घटक पक्षांमध्ये कोणी काम केले, कोणी मदत केली नाही, याची झाडाझडती सुरु असून आरोपप्रत्यारोप होत आहेत. त्यात ही कथित ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी टीका केली होती.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील बीडचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या कथित क्लिपमध्ये कुंडलिक खांडे यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले होते. आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा पंकजा मुंडे यांना धोका दिल्याचे या ऑडीओ क्लीपमध्ये कुंडलिक खांडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे महायुतीत मोठं वादळ निर्माण झाले आहे. बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे निवडून आले आहेत. पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव झाला आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाचा फटका या ठिकाणी बसला असल्याचे म्हटले जात आहे.
मोरे यांचे पत्र
शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या संदर्भातील पत्र पक्षाचे सचिव संजय भाऊराव मोरे यांनी काढले आहे. शिवसेना शिस्तभंग समितीच्या शिफारशीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून पक्ष विरोधी कार्य केल्याबद्दल कुंडलिक खांडे यांची हकालपट्टी करण्यात येत आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
कार्यलयाची तोडफोड
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिवराज बांगर आणि शिंदे गटाचे कुंडलिक खांडे यांच्यादरम्यान झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये शिंदे गटाचे कुंडलिक खांडे हे मी पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला,
T20 World Cup ‘तेव्हा’ सगळ्यांच्या हृदयाचे ठोके चुकले असतील !
असं म्हणत असल्याचं ऐकू येत आहे. आपण 376 क्रमांकाच्या बुथवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना मदत केली, असं कुंडलिक खांडे म्हणाले होते. संबधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले होते. बीड शहरातील जालना रोडवर असलेले खांडे यांचे कार्यालय जमावाने दगडफेक करुन तोडले होते हे विशेष.