Mahayuti News : सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे आता रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा शासकीय निधीतून होणार आहे. दरवर्षी रायगड येथे तिथीनुसार हा सोहळा आयोजित होणार आहे. यासंर्भातील तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. भव्यदिव्य स्वरूपात हा सोहळा साजरा होईल, अशी माहिती मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. शिवराज्याभिषेक सोहळ्याला नुकतेच 350 वर्ष पूर्ण झालेत. यानिमित्त मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शिवराज्याभिषेक सोहळा शासकीय निधीतून साजरा केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली होती.
मुनगंटीवार यांनी केलेल्या घोषणेनुसार अर्थसंकल्पात अजित पवार (Ajit Pawar) यांनी या सोहळ्यासाठी निधीची तरतूद केली. निधीची तरतूद झाल्यानंतर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात विधिमंडळात माहिती दिली. स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरील शिलालेखावर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अशी श्री शिवराज्याभिषेकाची स्पष्ट नोंद आहे. त्यात तारखेचा उल्लेख नाही. छ्त्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक सुरू केला तो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीलाच सुरू झाला.
सर्वसमावेशक चर्चा
तज्ज्ञ इतिहासकार, इतिहास अभ्यासक, शिवप्रेमी यांच्याशी यासंदर्भात चर्चा करण्यता आली. त्यानुसार श्रीशिवराज्याभिषेक सोहोळा हा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीनुसारच होणे संयुक्तिक आहे, असे ठाम प्रतिपादन सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ही बाब केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यापुरतीच मर्यादित आहे
1962 मधे यशवंतराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या रायगडची जीवनकथा या पुस्तकात रायगडावरील शिलालेखाची आणि श्रीशिवराज्याभिषेक तिथीची सविस्तर माहिती दिलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत यावर भाष्य केले. सरकारने शिवजयंती, जिजामाता जयंती, छत्रपती संभाजी महाराज जयंती व पुण्यतिथी हे शासकीय कार्यक्रम तिथीनुसार करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितल्याचे ते म्हणाले. सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. त्यात हे सांगितल्याचे आमदार आव्हाड यांनी सभागृहात सांगितले. त्यावर निवेदनात उत्तर देताना मुनगंटीवार म्हणाले की, अशी कोणतीही मुलाखत आपण दिलेली नाही. अशी कोणतीही घोषणाही करण्यात आलेली नाही. आजपर्यंत रायगडावर श्री शिवराज्याभिषेक सोहळा शासनातर्फे साजरा करण्यात येत नव्हता. आता रायगडावरील श्री शिवराज्याभिषेक सोहळा हा शासनाकडून करण्याचा निर्णय झाला आहे.
रायगडावरील शिलालेखानुसार तो तिथीनुसार करावा, इतकाच निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा शिवजयंती, जिजामाता जयंती, छत्रपती संभाजी महाराज जयंती व पुण्यतिथी या आधीपासून सुरू असलेल्या शासकीय कार्यक्रमांशी काहीही संबंध नाही, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.