PUNE : लोकसभा निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या प्रशासकीय कामकाजाबाबत थेट महसूल सचिव आणि निवडणूक आयोगाकडे बिनबुडाचे आरोप खेडचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी केले होते. या प्रकरणी जोगेंद्र कट्यारे यांचे 29 जून शुक्रवारी अखेर निलंबन करण्यात आले आहे. जनमानसात शासनाची प्रतिमा मलिन केल्याबद्दल आणि निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांच्या मनात हेतुपुरस्सर संशय निर्माण केल्याबद्दल राज्य शासनाने ही कारवाई केली आहे
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
महसूल विभागाचे अवर सचिव संजीव राणे यांनी याबाबतचा आदेश काढला. कट्यारे यांची चौकशी करण्यात येईल. पुढील दहा दिवसांत त्यांना चौकशी समितीसमोर आपले म्हणणे व्यक्तीशः मांडावे लागेल. जिल्हाधिकारी दिवसे राजकीय प्रभावाखाली येऊन खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याशी संगनमताने काम करत असल्याचा आरोप कट्यारे यांनी लोकसभा मतमोजणीच्या दोन दिवस आधी केला होता. याबाबत त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, राज्याचे प्रधान सचिव, महसूल सचिव यांना थेट पत्र पाठविले होते. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून त्यांचा पदभार विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी काढून घेतला होता.
आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी कट्यारे यांच्या शिस्तभंगाबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविला होता. यावर शासनाकडून कट्यारे यांना महसूल विभागाकडून 20 जून रोजी नोटीस पाठविण्यात आली. आठ दिवसांत लेखी उत्तर द्यावे, असे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र कट्यारे यांनी नोटीस नाकारली. अखेर जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या निवासस्थानाच्या दरवाजावर नोटीस लावण्यात आली. त्यानंतरही कट्यारे यांनी मुदतीत कुठलेच उत्तर दिले नाही. त्यामुळे गैरवर्तनाचा दोषारोप निश्चित करून त्यांच्यावर शुक्रवार 29 जून रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली.
आयोगाला पत्र
लोकसभा निवडणुकीत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अशा मजकुराचे पत्र थेट निवडणूक आयोगाला पाठविले होते. यामुळे दोन उच्चपदस्थ अधिकार्यांमधील वाद चव्हाट्यावर आल्याने राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
या पत्रात कट्यारे यांनी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावरही आरोप केले होते. मोहिते पाटलांच्या सांगण्यावरून जिल्हाधिकारी दिवसे मानसिक छळ करत असल्याचे त्यांनी तक्रार केली होती. निवडणूक असतानाही पुणे रिंग रोडच्या कामात गुंतवून ठेवले. आता हे सर्व सहन होत नसल्याने माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असे कट्यारेंनी पत्रात नमूद केले होते.