Monsoon Session : अकोला शहरातील हिंदू ज्ञानपीठ शाळा बंद करण्याच्या मुद्द्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आव्हान दिले आहे. यासंदर्भात शनिवारी (ता. 29) मिटकरी यांनी विधान परिषदेत मुद्दा उपस्थित केला. अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य दावणीला बांधत एकाएकी शाळा बंद केलीच कशी जाऊ शकते, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
अकोल्यात एकेकाळी प्रचंड नावलौकिक असलेले चंद्रशेखर गाडगीळ यांच्या मालकीची ही शाळा आहे. ही शाळा बंद करण्याचा निर्णय एकाएकी व्यवस्थापनाने घेतला. शाळेतील विद्यार्थ्यांना अन्यत्र प्रवेश घेण्याची सूचना व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील आंदोलन केले होते. मनसेचे पंकज साबळे यांनी हा मुद्दा सगळ्या पहिले उचलून धरला होता. त्यानंतर आता आमदार मिटकरी यांनी यावर विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला आहे.
हिंदू ज्ञानपीठ शाळा बंद होत असल्यामुळे आरटीई (RTE) अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेच्या व्यवस्थापनाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासमोर आटीईमधील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबाबत होकार दर्शविला होता. मात्र शाळा बंद होत असल्यामुळे अनेक शिक्षकांनी सेवा सोडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविणार कोण असा प्रश्न निर्माण झाल्याकडे मिटकरी यांनी लक्ष वेधले. सद्य:स्थितीत शाळेत डेस्कबेंच, पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवथा असे काहीच उपलब्ध नाही. स्वच्छतागृहांमध्ये सुद्धा अस्वच्छता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे, असे मिटकरी म्हणाले.
विद्यार्थ्यांचे काय होणार?
हिंदू ज्ञानपीठ शाळेने गाशा गुंडाळण्याची तयारी केल्याने पालक चिंतेमध्ये आहे. ऐनवेळी त्यांची प्रवेशासाठी धावाधाव होत आहे. हा संपूर्ण प्रकार गंभीर आहे.
NEET Exam Scam : परप्रांतियांनी बोगस प्रमाणपत्रांवर परीक्षा दिली, सरकार झोपले होते का?
अन्य विद्यार्थी शाळ सोडून जातील. परंतु आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाल्याचे आमदार मिटकरी यांनी नमूद केले. एकूण शाळेच्या या निर्णयामुळे व वागणुकीमुळे पालक, विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे समायोजन गरजेचे झाले आहे.
ऐनवेळी शाळा बंद पडत असल्याने अकोल्यात आंदोलनही होत आहे. याची सरकारने दखल घेतली पाहिजे, असे आमदार मिटकरी म्हणाले. आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांचे समायोजन सगळ्यात आधी व्हायला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यासाठी अकोल्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी विस्तृत अहवाल तयार केला आहे. हा अहवाल शिक्षण संचालकांना पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव तत्काळ निकाली काढणे गरजेचे आहे. लवकरच शालेय सत्र सुरू होणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी हा मुद्दा निकाली काढणे गरजेचे असल्याचे मिटकरी म्हणाले.