Monsoon Session : ग्रामपंचायतस्तरावर काम करणाऱ्या रोजगार सेवकांना नियमित सरकारी सेवेत घेण्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला आहे. प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते तथा आमदार बच्चू कडू यांनी यासंदर्भात सरकारकडे आग्रही मागणी केली. विधानसभेत बोलताना बच्चू कडू यांनी सरकारचे लक्ष ग्रामपंचात पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे वेधले. ते म्हणाले की, महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घेण्यात आले आहे. परंतु आजही अनेक ग्रामपंचायतींमध्ये केवळ रोजंदारी पद्धतीने काम सुरू आहे. त्यातच रोजगार सेवकांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. ग्रामपंचायतींमधील कर्मचारी खेड्यांमधील जनतेच्या हिताची कामे करतात. त्यांना अनेकदा दोन ते तीन महिने वेतन मिळत नाही.
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रतिकूल परिस्थिती काम करावे लागते. अशात त्यांना सेवेत सामावून घ्यायला पाहिजे. परंतु त्यांना वेतनापसून वंचित ठेवण्यात येत असेल तर हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे. तीन महिन्यांपासून अनेक कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही, असे बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगितले. याशिवाय श्रावणबाळ योजना, निराधार योजना अशा अनेक योजनांमधील रक्कमही नागरिकांना मिळत नसल्याची तक्रार आमदार बच्चू कडू यांनी केली. योजनांमधून मिळणारी रक्कम आधीच कमी आहे. अशात ती मिळत नसेल तर गरीबांनी कोणाकडे पाहावे, असेही ते म्हणाले.
डोळे पाणावले
आपल्याला एक निराधार वृद्ध महिला भेटली. या महिलेने योजनेतील रक्कम मिळाली नसल्याचे सांगितले. तिची परिस्थिती ऐकल्यावर डोळे पाणावल्याचे आमदार बच्चू कडू यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. ही अवस्था का होत आहे. सरकारच्या सर्वच योजनांमधून वेळेवर पैसे मिळाले पाहिजे, असेही आमदार बच्चू कडू म्हणाले. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिले. विविध योजनांमधून लाभार्थ्यांना रक्कम मिळायला विलंब होणार नाही, असे ते म्हणाले. गरीबांच्या हितासाठी असेलल्या सर्वच योजनांमधील रक्कम प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत त्यांच्या खात्यात कशी जाऊ शकेल याची व्यवस्था केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
Maharashtra Assembly : हा शिंदे कधी खोटं बोलला नाही, बोलणार नाही!
दिव्यांगांनाही सरकारकडून मदत केली जात आहे. वेगवेगळ्या योजनांमधून त्यांना मदत करण्यात येत आहे. यासाठी देखील निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. गरीबांना सरकारकडून त्यांच्या हक्काचा पैसा देण्यात येत आहे. तो वेळेवर मिळावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली. त्यावर पवार यांनी यासंदर्भात केवळ दिव्यांगच नव्हे तर सर्वच लाभार्थ्यांबाबत काळजी घेण्यात येईल, अशी ग्वाही देण्यात यावी.