महाराष्ट्र

Maharashtra Assembly : नागपुरातील स्फोटाचा मुद्दा विधानसभेत गाजला

Anil Deshmukh : विधानसभेत सरकारकडे केली कारवाईची मागणी

 

Nagpur Blast : नागपुरातील धामणा गावात झालेल्या स्फोटाचा मुद्दा शनिवारी (ता. 29) विधानसभेत गाजला. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावर चर्चेला सुरुवात केली. नागपुरात स्फोटाची घटना घडल्यानंतर संबंधित कारखान्यातील मालक आणि मॅनेजर पळून गेल्याची तक्रार त्यांनी सभागृहात केली. आपण आणि नागरिकांनी धावाधाव करीत रुग्णवाहिका बोलावली.

https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35

जखमींना रुग्णालयात हलविले असे त्यांनी सांगितले. कारखान्यात पुरेशी खबरदारी घेण्यात आली नव्हती, अशी टीका त्यांनी केली. कारखान्यामध्ये काम करणाऱ्या श्रमिकांत अत्यंत तुटपुंजा पगार देण्यात येत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. यासंदर्भात चौकशी करणे गरजेचे आहे. श्रमिकांना आपत्कालीन परिस्थितीबाबत कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नव्हते. कोणताही बचावात्मक पोषाख कारखान्यात नव्हता, असेही देशमुख यांनी सरकारच्या लक्षात आणून दिले. 

कारखान्यामध्ये प्रशिक्षित कामगार ठेवणे अपेक्षित आहे. असे नसेल तर कामगारांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. काही बाबतीत प्रशासकीय मान्यताही घ्यावी लागते. परंतु नागपुरात हे निकष पाळण्यात आले नाहीत. स्फोटक निर्मिती करणाऱ्या कारखान्यात काही नियम असतात. तेथे प्रथमोपचार पेटी असावी लागले. अपघात घडल्यास तत्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था करावी लागते. अग्निशमन यंत्रणा असावी लागते असे हे नियम आहेत. आपण स्फोटानंतर कारखान्यात पोहोचलो तोवर कामगार शंभर टक्के भाजले होते. त्यामुळे स्फोटाचा हा प्रकार अत्यंत गंभर असल्याचे अनिल देशमुख म्हणाले. घटनास्थळावर चित्र हृदय पिळवटून टाकणारे होते. परंतु मॅनेजर किंवा मालक तेथे यायला तयार नव्हते.

डॉक्टर दंदे यांची स्तुती

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरातील प्रतिष्ठित डॉक्टर पिनाक दंदे यांची विधानसभेत स्तुती केली. स्फोटातील जखमी कामगारांना नागपुरातील रवीनगर चौकाजवळ असलेल्या दंदे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कोणत्याही औपचारिकतेची प्रतीक्षा न करता डॉ. पिनाक दंदे आणि त्यांच्या चमूने जखमींवर तत्काळ उपचार सुरू केले. त्यामुळे दंदे हॉस्पिटलच्या टीमचे कौतुक करावे लागेल, असेही अनिल देशमुख विधानसभेत म्हणाले.

NEET Exam Scam : ‘नीट’च्या मुद्द्यावर सभागृहात सत्ताधारी व विरोधी पक्षाचे एकमत !

सेनगुप्ता हॉस्पिटलच्या बाबत मात्र देशमुख यांनी विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. देशमुख म्हणाले की, पैसे न भरल्यामुळे सेनगुप्ता हॉस्पिटलचे जखमींवर उपचार करण्यास नकार दिला. जोवर पैसे भरणार नाही, तोवर आम्ही रुग्णांना हात लावणार नाही अशी भूमिका सेनगुप्ता हॉस्पिटलने घेतल्याची गंभीर तक्रारही देशमुख यांनी केली. महसूल विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. परंतु त्यांनी यात हस्तक्षेप केला नाही, असा संताप देशमुख यांनी व्यक्त केला. रुग्णालयातमध्ये दोन हजार रुपये भरून घेण्यात आले. त्याची पावतीही देशमुख यांनी सभागृहात दाखविली.

हॉट सिलिंग यंत्रामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटाच्या या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देशमुख यांनी केली. राज्य सरकारने कामगारांना 25 लाख रुपयांची मदत केली पाहिजे अशी मागणीही देशमुख यांनी केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडे‌ट्टीवार यांनी यासंदर्भात अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले. शासकीय विभागाकडून कारखान्याची वेळोवेळी तपासणी करण्यात आली नव्हती का, असा सवाल त्यांनी केला. अग्निशमन दल, आरोग्य विभाग, कामगार विभाग झोपा काढत होते का? असा संतापही त्यांनी व्यक्त केला. नागपुरातील उद्योगांमध्ये सातत्याने स्फोटाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे कामगारांचा जीव जाणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावर सरकारकडून गंभीर दखल घेण्यात येणार असल्याची ग्वाही मंत्र्यांनी दिली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!