Assembly Session : अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता. 28) राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. विधिमंडळात दहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. अर्थसंकल्पावर नेहमीप्रमाणे विरोधकांनी टीकाच केली आहे. परंतु राज्याच्या तिजोरीचा ‘पासवर्ड’ अर्थमंत्री म्हणून सांभाळण्याचा अनुभव असलेले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारच्या अर्थसंकल्पाची स्तुती केली आहे. अर्थसंकल्पातून शेवटच्या व्यक्तीला आधार मिळणार असल्याची प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचे राज्य व कल्याणकारी संकल्पना साकार करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
अर्थसंकल्प लोकाभिमुख आणि कल्याणकारी आहे. राज्यातील विकासकामे व योजना पुढे घेऊन जाणारा आहे, असे ते म्हणाले. मुनगंटीवार यापूर्वी अर्थमंत्री होते. त्यामुळे राज्याच्या तिजोरीची व अर्थसंकल्पातील तरतुदींची कल्पना त्यांना आहे. आपल्या अनुभवाच्या आधारावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अडीच कोटी महिलांना होणार आहे. त्यांना दरमहा 1 हजार 500 रुपये थेट खात्यात मिळणार आहेत. ही देशातील सर्वांत मोठी योजना असेल. महिलांचे शिक्षण सुलभ, सहज होण्यासाठी आर्थिक निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना शिक्षणात शंभर टक्के सवलत देण्याचा निर्णयही क्रांतीकारी आहे.
बळीराजाचे कल्याण
राज्यातील शेतकऱ्यांना 14 हजार 700 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. 40 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या विजेत शंभर टक्के सूट जाहीर झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे रयतेच्या कल्याणासाठी कार्य करायचे, तीच संकल्पना आता साकार होत आहे, असे मुनगंटीवार यांनी नमूद केले.
Maharashtra Budget : दादांच्या पोटलीतून ‘सीएम लाडकी बहिण योजना’
रायगड येथील शिवराज्याभिषेक सोहळा आता शासनाच्या माध्यमातून दर वर्षी साजरा होणार आहे. शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी यंदा मुनगंटीवार यांनी खास पुढाकार घेतला होता. त्यामुळे त्यांच्यासह शिवप्रेमींमध्ये चैतन्य आणि उत्साह दिसला. बेरोजगार युवक, विद्यार्थ्यांना दरमहा अनुदान जाहीर झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
विनामूल्य तीन गॅस, सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदानही भरीव आहे. सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्य व्यवसाय या तीन विभागांसाठी अर्थसंकल्पात केलेल्या वित्तीय तरतुदीबद्दल मुनगंटीचार यांनी समाधान व्यक्त केले. यातन हाती घेतलेल्या योजना नक्कीच पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अर्थसंकल्पामुळे विरोधी पक्ष विचलित झाला असेल. त्यांच्याकडून दोष काढण्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहे. ती त्यांची सवयच आहे. कितीही चांगले काम केले तरी खोट काढले ही त्यांची वृत्तीच आहे. परंतु राज्यातील जनता खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.