‘राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा अर्थात ‘नीट’मधील गैरव्यवहार पुढे आल्यानंतर देशभर चांगलेच वातावरण तापले. भावी डॉक्टरांना दिशा देणाऱ्या या अभ्यासक्रमातच मोठा घोळ होत असल्याने एकूणच राष्ट्रीय परीक्षा प्रणालीवरच प्रश्न निर्माण झाले. या प्रकरणात आता दररोजच नवनवीन माहिती पुढे येत आहे. ‘नीट’ प्रकरणातील ‘लातूर’ कनेक्शन पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा शिक्षण क्षेत्रातील ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा सुरू झाली आहे. अशात आता या प्रकरणातील ‘मोठे मासे’ सीबीआयच्या गळाला लागतील का? याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
‘नीट’मधील गैरव्यवहारानंतर देशभरात खळबळ माजली. त्यात आता ‘नीट’ पेपर फुटीमध्ये लातूरमधील सहभाग पुढे आला आहे. परीक्षेतील पेपर फुटी प्रकरणात विरोधकांनीही केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. दरम्यान केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला आहे. आता या प्रकरणातील आरोपी संजय जाधव याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. वैद्यकीय तपासणीनंतर लातूर येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात संजय जाधव याला अटक करण्यात आली. राज्यातील नीट पेपर फुटीचे लातुर कनेक्शन समोर आल्यानंतर या प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. जलील खा पठाण एकमेव आरोपी पोलिसांच्या ताब्यात होता. मात्र, लातूर पोलिसांना संजय जाधवला ताब्यात घेण्यात यश आले आहे.
नीट परीक्षांमधील घोटाळ्यामुळे देशभरातली अनेकांच्या भुवया उंचावल्या. देशभर खळबळ उडवून देणाऱ्या नीट परीक्षेच्या पेपर फुटीनंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. काँग्रेसकडून देशभर आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान आता केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला. तसेच राष्ट्रीय चाचणी संस्थेचे (एनटीए) महासंचालक सुबोध कुमार सिंग यांची हकालपट्टी करण्यात आली. तपास हातात घेताच सीबीआयने या प्रकरणात जोरादार कारवाई सुरु केली आहे. सीबीआयने या प्रकरणातील बडे मासे जाळ्यात ओढण्यासाठी काम सुरु केले.
लातूरच्या आरोपींचे कनेक्शन दिल्लीत
नीट पेपर फुटी प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींचे कनेक्शन असल्याचे समोर आले आहे. लातूर येथील संजय जाधव, जरील खान, उमरखान पठाण यांचा अजून एक साथीदार याच भागातील आहे. इरणणा कोनगलवार, असे या प्रकरणातील चौथ्या आरोपीचे नाव आहे. तो धाराशिवमधील उमरगा जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. या चारही आरोपींचा संपर्क दिल्ली येथील गंगाधर नावाच्या व्यक्तीसोबत असल्याचे समोर आले आहे. म्हणजेच, नीट परीक्षेच्या पेपर्सच्या व्यवहारात दिल्लीतील व्यक्तीचा मोठा हात असल्याची माहिती समोर आली आहे.