Maratha Reservation: राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटला असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलन उभे केले. तर दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी ओसीबी आरक्षण बचावसाठी नुकतेच उपोषण केले. सध्या दोघांनाही उपोषण सोडले असले तरी वातावरण तापलेलेच आहे. अशात 24 जून रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घटना घडली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या डॉक्टराला काळं फासल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा संघटना आक्रमक झालेल्या आहेत. अशात मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणाला विरोध करणाऱ्या डॉक्टरच्या तोंडाला काळं फासल्याची घटना घडली. रमेश तारख असे काळं फासलेल्या डॉक्टरचे नाव आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात रमेश तारख यांनी अर्ज दिला होता. अर्ज दिलेल्या रमेश तारख यांना मराठा संघटनांनी काळे फासले. झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले. धक्कादायक म्हणजे, संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉ. तारख यांचा आधी सत्कार केला आणि नंतर काळे फासले. या घटनेमुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.
11 जुलैला शांतता रॅली
बीडमध्ये 11 जुलै रोजी मराठा आरक्षण जनजागृती तथा शांतता रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले. मनोज जरांगे स्वतः या रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. यासाठी बीड येथे सकल मराठा समाजाकडून व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत तालुकानिहाय नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यासाठी बीड जिल्ह्यातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीसाठी जिल्ह्यातील सकल मराठा समाजातील महिला, पुरुष, युवक, युवती सहभाग नोंदवणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.
जरांगेंचा मराठा नेत्यांवर हल्लाबोल?
मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. सगळ्या पक्षातील ओबीसी नेते हे मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी एकवटले आहेत. ते मताचा विचार करत नाहीत आरक्षणाचा विचार करत आहेत. मात्र आपले नेते मतांचा विचार करतात. मराठ्यांच्या नेत्यांनी समजूतदारीची भूमिका घेणे गरजेचे आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, विरोधी पक्षनेते हे सगळे ओबीसी नेते एकवटले आहेत. हे मराठा नेत्यांना समजत नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.