Gadchiroli : गावातील महिलेला अश्लील मेसेज करुन त्रास देणाऱ्या उपसरपंचाला न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. वारंवार महिलेला अश्लील मॅसेज करणे, तिला फोन करून बळजबरीने अश्लील बोलणे याप्रकारात अरेरावी करणाऱ्या उपसरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याला न्यायालयानेही शिक्षा ठोठावली.
https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35
धर्मय्या किष्टय्या वडलाकोंडा वय 43 वर्ष रा. असरअली ता.सिरोंचा असे शिक्षा झालेल्या उपसरपंचाचे नाव आहे. या विक्षिप्त कृत्याप्रकरणी अहेरी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी उपसरपंचाला 5 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
उपसरपंचाची चक्क दादागिरी
आरोपी धर्मय्या वडलाकोंडा हा नेहमी पीडित महिलेच्या घरी जायचा. शिवाय तिच्याशी फोनवर अश्लील संभाषण करून तिला अश्लील मेसेज पाठवायचा. आरोपीकडून सतत होत असलेले कृत्य सहन न झाल्याने पीडितेने ही गोष्ट आपल्या पतीला सांगितली. संतापलेल्या पतीने आरोपीच्या घरी जाऊन त्याला जाब विचारला.
Narendra Bhondekar : आमदाराने सांगितली काम करून घेण्याची ‘निंजा टेक्निक’
मात्र उलटपक्षी आरोपीने शिवीगाळ करीत ‘तुला काय करायचे ते करून घे’ असे धमकावले. शिवाय धर्मय्याच्या पत्नीने पीडितेच्या घरी जाऊन तिच्या पतीला पोलिसात तक्रार करायची धमकी दिल्याची तक्रार संबधित पीडित महिलने केली.
पीडितेने केलेल्या तक्रारीनुसार असरअली पोलिसांनी उपसरपंच धर्मय्या किष्टय्या वडलाकोंडा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी पवार व गजानन राठोड यांनी अहेरीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात संशयित आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.
21 जूनला या प्रकरणावर सुनावणीत झाली. यात अहेरी अतिरिक्त सत्र न्यायालयाने निकाल दिला. न्यायालयाने फिर्यादी व साक्षदारांचा पुरावा आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपी धर्मय्या वडलाकोंडा यास पाच हजाराचा दंड ठोठावला आहे. शिवाय यापुढे तीन वर्षे असे कृत्य करणार नाही, असे हमीपत्र लिहून घेतले. याप्रकरणी सरकारी पक्षाद्वारे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी काम पाहिले आहे.