Political News : भंडारा-गोंदिया या लोकसभा क्षेत्रात काँग्रेसला मिळालेले यश हे पक्षाच्या विधानसभेसाठी ‘गेमचेंजर’ ठरेल असेच चित्र निर्माण झाले आहे. विद्यमान खासदाराला नवख्या उमेदवाराकडून पराभवाची धूळ चारून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजकीय चातुर्याचीच चर्चा दिल्लीपासून गल्लीत रंगली होती. अशात आता थेट भाजपच्या गोटात शिरुन त्यांच्या नेत्याला गळाला लावल्याची खमंग चर्चा सुटली आहे. त्याला कारण म्हणजे, गोंदियातील माजी आमदार रमेश कुथे यांनी भारतीय जनता पार्टीचा दिलेला राजीनामा. रमेश कुथे यांचा राजीनामा हा गोंदियातील भाजप गोटाला धक्का असला तरी यामागे नाना पटोलेंची खेळी असल्याचे देखील बोलले जाते.
विशेष म्हणजे, मध्यरात्री नाना पटोले यांनी थेट रमेश कुथे यांच्या घरी भेट दिली होती. त्यानंतरच कुथे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कुथेंच्या राजीमान्यामध्ये आता नाना पटोलेंच्या ‘गेम’चीच चर्चा सुरू आहे.
माजी आमदार रमेश कुथे यांनी राजीनाम्याबाबतचे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविले. गोंदिया विधानसभेवर शिवसेनेकडून दोनवेळा आमदार राहिलेले व त्यानंतर भाजपमध्ये आलेले रमेश कुथे यांच्या अचानक राजीनाम्याने चर्चेला उधान आले आहे. ‘माझ्या समर्थकांकडून मला भाजपपासून दूर होण्याचा आग्रह केला जात आहे. त्यामुळे मी भाजप पासून दूर होत आहे’. असे राजीनामापत्रर मेश कुथे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविले.
‘त्या’ रात्री काय चर्चा?
या राजीनामा सत्रानंतर गोंदिया जिल्ह्यात कारणमीमांसा सुरू आहे. दरम्यान या राजीनामा सत्रात नाना पटोले यांची विशेष भूमिका असल्याचे बोलले जाते. आठवडा भरापूर्वीच मध्यरात्रीच्या सुमारास रमेश कुथे यांच्या घरी जाऊन नाना पाटोले यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर कुजबुज सुरू झाली होती. आता कुथेंनी राजीनामा दिल्याने गोंदियाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. कुथे यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्या काँग्रेस प्रवेशासंदर्भात अद्याप कुठलीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
राजकीय भवितव्यासाठी काँग्रेसची कास?
दरम्यान कुथे यांच्या राजीनामा बाबत अजून एक चर्चा रंगू लागली आहे. गोंदिया विधानसभेमध्ये भाजपकडून त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता नगण्य होती. त्यामुळे आपल्या राजकीय भवितव्यासाठी त्यांनी काँग्रेसची पर्यायाने नानांची कास धरल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांनी अद्याप काँग्रेस पक्ष प्रवेश केल्याचे अधिकृत माहिती नाही.