अमरावतीमधील अचलपूरचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधीक्षकांना एक खळबळजनक पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला आहे. सध्याचे राजकीय वातावरण लक्षात घेता माझ्यावर जीवघेणा हल्ला करण्याचे कटकारस्थान रचले जात आहे. माझ्या जिवाला काही झाले तर याची जबाबदारी आपली राहील, अशी ताकीदही पत्रातून आमदार बच्चू कडू यांनी पोलीस अधीक्षकांना दिली आहे.
बच्चू कडू यांनी पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात अनेक खळबळजनक दावे केले आहेत. या पत्रात बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव अत्यंत संवेदनशील प्रकारात जोडल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे या पत्राने नवा राजकीय भूकंप उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही लिहिले पत्रात?
4 मे ला अचलपूर परिसरातील प्रवासी निवाऱ्यालगत भाजी विक्री करणाऱ्या एका व्यक्तीजवळ काळा रंगावर लाल रंगाचा पट्टा असलेली दुचाकी थांबली. या दुचाकीवर एक व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून होती. त्याने सांगितले की, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कट्टर कार्यकर्ता असून गडचिरोली येथून आलेला आहे. माझा नक्षलवाद्यांशी जवळचा संबंध आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी ज्याप्रमाणे दिघेंना संपवले, तसे शिंदे साहेब बच्चू कडूला संपवणार नाहीत. तर मी स्वतः बच्चू कडूला संपवणार, अशी खळबळजनक धमकी त्या व्यक्तीने दिल्याचे सांगण्यात आले. त्या व्यक्तीने मोबाईलमध्ये त्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच आणि काही राजकीय नेत्यांसोबतचे फोटो देखील दाखवल्याचे बच्चू कडू यांनी पोलीस अधीक्षकांच्या पत्रात नमूद केले आहे.
अपघाताची अफवा
माझा अपघात झालाय अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येत आहेत. अपघात झाल्याची अफवा कोणीतरी पसरवत आहे. माझ्या जीविताला धोका उद्भवल्यास याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असेही आमदार बच्चू कडू यांनी पत्रात लिहिले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि प्रकरणात लक्ष घालून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या पत्रातून बच्चू कडू यांनी केली. यावर जिल्हा पोलीस ग्रामीणचे अधीक्षक पंकज कुमावत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आम्हाला आमदार बच्चू कडू यांचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार तपास सुरु आहे. बच्चू कडू यांना संरक्षण देण्यात आले आहे. यामध्ये पोलीसांनी गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरु आहे.