BJP : अपयश लक्षात घेता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रात झालेल्या पराभवाची मीमांसा करण्यास सुरुवात केली आहे. या मिमांसेतुन भाजपच्या असंतुष्ट नेते कार्यकर्त्यांनीच निवडणुकी दरम्यान पक्षविरोधी काम केल्याचे समोर आलेले आहे. या पक्षविरोधी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील तब्बल 56 लोकांची यादी भाजपने तयार केलेली आहे. विशेष म्हणजे भंडारा भाजप नेत्यांचाही या लिस्टमध्ये समावेश असल्याची धक्कादायक माहिती ‘द लोकहित’ला मिळाली आहे. आता या घरच्या ‘भेदी’वर लवकरच पक्षांतर्गत कारवाई करण्याचे संकेत मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेला पराभव भाजपच्या पचनी पडला नाही. निकाल लागून पंधरवाडा लोटला, तरी पण दिल्लीतील भाजप पक्ष श्रेष्ठिकडून पराभवाची कारणमीमांसा सुरू आहे.
दरम्यान फितुरांची शोधमोहीम हाती घेतली असल्याचे सामोर येत आहे. पक्षातील घुसखोरांचा शोध घेत असताना पुराव्यासह अनेक फितुरांची यादी तयार झाली आहे. या दगाबाजांवर आता कारवाई ही पक्षश्रेष्ठीकरणार आहे.
कोणाचे नाव यादीत?
विशेष म्हणजे या यादीतील 56 लोकांमध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील नेते, कार्यकर्त्यांचे नाव समाविष्ट असल्याचे खात्रीशीर माहिती ‘द लोकहीत’ला मिळालेली आहे. तत्त्कालीन खासदार सुनिल मेंढे यांना 2019 च्या निवडणुकीत 6 लाख 50 हजार 243 मते मिळाली होती. त्यावेळी आघाडीचे नाना पंचबुद्धे हे त्यांच्याविरूद्ध रिंगणात होते. यावेळी भाजपसोबत राष्ट्रवादी नसताना मेंढे यांना 5 लाख 50 हजार 30 मते मिळाली. ही मते मागील वेळेपेक्षा 1 लाखाने कमी आहे. मागील निवडणुकीतील मतेही त्यांना कायम राखता आले नाही. सरकारने लोकहिताच्या योजना आखल्या तरी, भाजपचे मताधिक्य घटले आहे. त्यामुळे याला कारणीभूत स्थानिक राजकारण- गटबाजी, तसेच दगाबाजी असल्याचे पक्षश्रेष्ठींनी अधोरेखित केलेले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीचवेळी त्यांचा बंदोबस्त करण्याचा चंग पक्षश्रेष्ठीने बांधला आहे.
फूकेंना मिळणार महत्वपूर्ण जबाबदारी
या सर्व घडामोडीत माजी मंत्री डॉ. परिणय फुके हे पक्षश्रेष्ठींच्या ‘गुड़ बुक’ मध्ये असल्याने त्यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे कळले आहे. त्यामुळे भंडारा गोंदिया भाजपची ‘मुठ बांधणी’चे काम करावे लागणार आहे. आता भंडाऱ्यातील कोणत्या ‘विभीषण’ वर कारवाई होते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.