Political War : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अपयशाचे खापर एकमेकांवर फोडण्याचे सत्र थांबता थांबेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला या निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांच्यावर टिकेची झोड उठत आहे. विशेष म्हणजे ही टिकेची झोड विरोधकांपेक्षा महायुतीतील त्यांचे सहकारी पक्षांकडूनच उठत असते. आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात जाहिररित्या त्यांच्यावर टिका करण्यात आली आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाचे नुकसान झाले. अनेक आमदारांना सत्तेपासून दूर रहावे लागल्याचे आरोप केले. मात्र या आरोपांना अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. अजित पवार होते म्हणूनच तुमची लंगोट वाचली अन्यथा हिमालयात जप करायला जावे लागले असते, असा खोचक टोला मिटकरींनी लगावला.
शिवसेनेचा 58वा वर्धापन दिवस कार्यक्रम पार पडला. या वर्धापन दिनाचे दोन मेळावे झाले. वरळीतल्या डोम सभागृहात एकनाथ शिंदेंनी मेळावा घेतला. तर षण्मुखानंद हॉलमध्ये ठिकाणी उद्धव ठाकरेंचा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे गटावर, भाजपावर जोरदार निशाणा साधला. तर एकनाथ शिंदेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले. दरम्यान यावेळी शिवसेना नेते रामदास कदम यांनीही भाषण करीत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. रामदास कदम म्हणाले, अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानेच आमच्या आमदारांना मंत्रिपदापासून दूर रहावे लागले. त्यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी जाहिर नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार थोडे दिवस नसते आले तरीही चालले असते. असे रामदास कदम फडणवीसांना उद्देशून म्हणाले. तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री केल्याबद्दल त्यांनी आभारही मानले. मात्र अजित पवार महायुतीत आल्याने महायुतीतली नाराजी त्यांनी अशा पद्धतीने बोलून दाखवली आहे.
अंगावर आलेल्यांना शिंगावर घेऊ : मिटकरी
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. मिटकरी म्हणाले, अजितदादा होते म्हणूनच महायुतीची लंगोट तरी वाचलीय. ते नसते तर यापेक्षाही खराब हाल झाले असते, असा टोला मिटकरींनी रामदास कदमांना लगावला.
Dharmarao Baba Atram : पटेलांच्या गोंदियातून आत्रामांची माघार
भाजप आणि शिंदे गटाचे नेते ठरवून अजित पवारांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. मिटकरींनी यापुढे कुणी अंगावर आले तर त्यांना त्याच पद्धतीने शिंगावर घेऊ, असा इशारा दिला. दरम्यान, आपले कान टोचणारे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी अजित पवारांवर बोलणाऱ्या महायुतीतील भाजप, शिंदे गटाच्या नेत्यांना आवरण्याचे आवाहन मिटकरींनी केले.