महाराष्ट्र

Gondia Politics : विरोधक एकत्र आले पण तिकीट कुणाला

Congress : विधानसभेत अर्जुनी मोरगावचे मतदार पेचात?

Political News : लोकसभेच्या निकालानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची लगबग वाढली आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात डॉ. प्रशांत पडोळे यांच्या विजयाने काँग्रेसने दोन्ही जिल्ह्यात बाहु बळकट केले आहेत. अशात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मतदार संघात मात्र महायुतीमध्ये प्रचंड पेच निर्माण होत असल्याचे दिसून येते. 2019 मध्ये माजी मंत्री राजकुमार बडोले यांना पराभूत करून राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी आमदारकीची माळ गळ्यात पाडली. यानंतर राज्यात अनेक फेरबदल आणि दलबदलही झाले. अशात चंद्रिकापुरेंनी अजित पवार गटाला समर्थन दिले. सध्या महाराष्ट्रात भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी महायुतीची सरकार आहे. आगामी विधानसभा महायुती सोबत लढण्याची शक्यता बोलली जाते. अशात अर्जुनी मोरगावमधील दोन्ही पारंपरिक विरोधक महायुतीत असल्याने आता तिकीट कुणाला? हाच प्रश्न विचारला जात आहे.

अर्जुनी मोरगावमध्ये या दोन प्रबळ नेत्यांसोबतच अनेक ‘हौसे, गवसे’ही विधानसभेत उडी मारण्याच्या तयारीत आहेत. तालुक्यातील अनेक गावांत आणि शहरात अशा ‘हौशीं’चे बॅनरही झळकू लागले आहे. यात काही ‘ट्राय अगेन’ आहेत तर काही प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात येण्यासाठी खटाटोप करीत आहेत. कुणी पक्षश्रेष्ठींना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काही ग्राउंड लेव्हलच्या नेत्यांना सोडून हायटेक नेत्यांच्या संपर्कात आहेत.

काही स्वयंभू कार्यकर्ते स्वतःच्या नावासमोर ‘भाऊ’ शब्दाचा उल्लेख करून समाजमाध्यमावर संदेश प्रसारित करण्यात धन्यता मानत आहेत. प्रत्येक राजकीय पक्षात उमेदवारीसाठी भाऊगर्दी दिसून येत आहे. काहींनी सहा महिन्यांपूर्वीपासून तयारी चालवली आहे. तर काही अनुभवी व जाणते स्पर्धक उमेदवार शांत व संयमाने तयारी करत आहेत. असे असले तरी ऐनवेळी अनपेक्षित नाव पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुसरीकडे महायुतीत उमेदवारीसाठी घेऊन प्रचंड चुरस आहे. विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत. याच महायुतीत भाजपचे माजी आमदार राजकुमार बडोले आहेत. ही जागा कोणत्या पक्षाच्या वाट्याला येते, हे बघणे रंजक राहील. या दोन्ही पक्षांत आणखी बरेच इच्छुक आहेत. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची दाट शक्यता आहे. कारण महाविकास आघाडीतील दोन्ही राजकीय पक्षांचे पाहिजे तसे प्राबल्य या मतदारसंघात नाही. महाविकास आघाडीतही उमेदवारांवरून प्रचंड चुरस आहे.

 काँग्रेसचा विजय

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने या विधानसभेत 20 हजार 658 मतांची आघाडी घेतली होती. ही आघाडी कायम ठेवण्याचे आव्हान काँग्रेस समोर असेल. पक्षाची उमेदवारी मिळाली नाही म्हणून ऐनवेळी पक्षांतर अथवा बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. येथून दोनवेळा भाजप व एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. त्यामुळे विशिष्ट एका पक्षाला कौल देणारा हा मतदारसंघ आहे, असे म्हणता येणार नाही.

BJP : फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदी राहू द्या : अनिल देशमुख

या मतदारसंघात दलित, आदिवासी व कुणबी समाजाची संख्या लक्षणीय आहे. पक्ष उमेदवाराच्या विजयात बसपा व वंचित बहुजन आघाडी पक्षाला मिळालेली मते निर्णायक ठरतात. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून दोन्ही पक्षांचे मताधिक्य घटल्याचे दिसून आले. हे चित्र विधानसभा निवडणुकीत कायम राहील का, हे येणारा काळच ठरवेल.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!