Mumbai News : लोकसभा निवडणूक पराभूत झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांना पुन्हा सरकारी वकील म्हणून लॉटरी लागली आहे. निकम यांच्या या नियुक्तीवर काँग्रेसने हरकत घेतली आहे. मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी यावर भाष्य केले. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने न्याय व्यवस्थेत आपली माणसे घुसविली आहेत. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची सरकारी वकील पदावर नियुक्ती केली जात आहे. भाजपा सरकार हा चुकीचा पायंडा पाडत आहे, असे पटोले म्हणाले.
उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकील पदाच्या नियुक्तीस काँग्रेस पक्षाने तीव्र विरोध केला आहे. सरकारने त्याचा फेरविचार करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार हे लोकांची परीक्षा पाहात आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा पाहात आहे. नीटमध्ये पेपरफूट झाली. पण सरकार त्याकडे गांभीर्याने पाहात नाही. केंद्रीय मंत्र्यांनी आधी पेपर फुटला नाही असे सांगितले. आता पेपरफूट झाल्याचे उघड झाले आहे. गुजरात व बिहारमध्ये पेपर फुटल्याचे सांगण्यात येत आहे, असे पटोले म्हणाले.
पोलिस भरतीचा घोळ
राज्यात पोलिस भरतीसाठी शारीरिक परीक्षा घेतली जात आहेत. पावसाळा सुरू झाल्यावर अशी चाचणी घेणे अन्यायकारक आहे. पावसाळ्यात मैदानांमध्ये चिखल असतो. त्याचा परिणाम होऊ शकतो असे ते म्हणाले. उमेदवारांना दुखापत होऊ शकते. हे सरकार व पोलीस प्रशासन यांनी लक्षात घ्यायला हवे होते. पण सरकार अघोरी काम करीत आहे, असे पटोले म्हणाले. राज्यात आजही दुष्काळाची परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी नाही. खरीप हंमाग सुरू झाला आहे. परंतु राज्यात बी-बियाणे, खते व औषधांचा पुरेसा साठा नाही असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची लूट
बाजारात बोगस बियाणे विकून व्यापारी शेतकऱ्यांना लुटत आहेत. गुजरात व आंध्र प्रदेशातून त्याची तस्करी सुरू आहे. राज्य सरकारने या बोगस बियाणे व खत विक्रेते आणि कंपन्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. आतापर्यंत आचारसंहितेचे कारण देऊन शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जात नव्हता. आता निवडणूक संपली आहे. तरीही सरकार केवळ जय-पराजयाची आकडेवारी जुळविण्यात गुंतली आहे. सरकारने कर्जपुरवठा करावा किंवा निधी उपलब्ध करुन द्यावा, असेही नाना पटोले म्हणाले.
बदनामी करण्याचा प्रयत्न
एक व्हिडिओ दाखवून आपल्याला जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे. परंतु त्यात काही तथ्य नाही. एका कार्यकर्त्यांने पायावर पाणी टाकले. मी माझ्या हाताने माझे पाय धुतले. मी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतलेले नाही. पण त्यातून गैरसमज पसरविला जात आहे. काही झाले ते दिवसाच्या स्वच्छ प्रकाशात झाले आहे. त्यात काहीच लपलेले नाही. शेकडो लोक तेथे होते. ज्या लोकांचे पाय ईडी कारवाईत माखलेले आहेत, ते आता आरोप करीत असल्याचे पटोले म्हणाले. अशा लोकांनी रात्रीच्या अंधारात अनेक पाप केले आहेत. काँग्रेस पक्षाला लोकसभेत मिळालेल्या यशाने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे ते षडयंत्र रचत असल्याचे पटोले म्हणाले.