Congress News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड लोकसभेतून विजय मिळविला होता. मात्र त्यांनी आता त्या मतदार संघाचे खासदार म्हणून राजीनामा दिला आहे. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर वायनाड येथे पोटनिवडणूक होणार आहे. वायनाडमधून लोकसभेची जागा लढण्यासाठी त्यांनी आता बहिण प्रियंका गांधी यांचे नाव पुढे केले आहे. विशेष म्हणजे, या निर्णयाचे काँग्रेस गोटातून स्वागत करण्यात आले आहे. मात्र राहुल गांधींनी प्रियंका गांधींसाठी वायनाडचा राजीनामा दिल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
राहुल गांधी यांनी या लोकसभा निवडणुकीत रायबरेली आणि वायनाड या दोन मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. या दोन्ही मतदार संघात राहुल गांधींचा विजय झाला. अशात नियमांनुसार, निकाल लागल्यानंतर 14 दिवसांच्या आत दोनपैकी एक जागा रिक्त करावी लागते. याच कारणामुळे राहुल गांधी यांनी वायनाडची जागा सोडली.
प्रियंका गांधी वाड्रा यांना वायनाड लोकसभेतून लढविण्याच्या राहुल गांधी यांच्या निर्णयावर काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी यांनी मत व्यक्त केले. राहुल गांधींनी योग्य राजकीय निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधींनी त्यांची रायबरेली लोकसभा जागा कायम ठेवली आणि प्रियंका गांधी वायनाडमधून निवडणूक लढवल्याबद्दल काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी म्हणाले, मी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे आभार मानू इच्छितो. राहुल गांधी योग्य राजकीय निर्णय घेतला आहे. याशिवाय, उत्तर प्रदेशच्या जनादेशाचा आदर केला आहे. इंडिया आघाडीला 80 पैकी 43 जागा दिल्या आहेत, प्रियांका गांधी वड्रा वायनाडमधून 5 लाख मतांनी विजयी होतील, असा विश्वास प्रमोद तिवारींनी व्यक्त केला.
पारंपरिक मतदारसंघ ठेवला
राहुल गांधी यांनी रायबरेली मतदारसंघातून खासदार राहण्याचा निर्णय घेतला आणि केरळच्या वायनाडमधून खासदारकीचा राजीनामा दिला. रायबरेली ही जागा गांधी घराण्याची परंपरागत जागा मानली जाते. यापूर्वी सोनिया गांधी या मतदारसंघातून निवडणूक लढवून लोकसभेत पोहोचत होत्या. मात्र यावेळी त्यांना राज्यसभेत नियुक्त करण्यात आले. त्यामुळे या जागेवर राहुल गांधी लढले आणि त्यांनी पारंपरिक मतदारसंघ ठेवला आहे.
बालेकिल्ल्यासाठी राहुल गांधी भाऊक..
वायनाडमधून राजीनामा देताना राहुल गांधी भावूक झाले. ते म्हणाले, ‘मी वायनाडच्या लोकांचे आभार मानू इच्छितो, गेल्या 5 वर्षांत मी त्यांच्याशी भावनिक जोड निर्माण केली आहे. मी वायनाडला नियमितपणे भेट देत राहीन आणि माझ्या बहिणीच्या माध्यमातून तेथील लोकांशी संपर्कात राहिन. यावेळी प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या, ‘वायनाडमधून निवडणूक लढवताना मला खूप आनंद होईल. मी अजिबात घाबरत नाही. या जागेला मी स्वतःचा परिवार मानेल आणि निश्चितच विजयी होणार.