Political War : मुद्द्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी मौन तोडले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. त्यानंतर विरोधकांनी त्यांना लक्ष्य केले आहे. चिखलात माखलेले नाना पटोले यांचे पाय त्यांचा कार्यकर्ता धुवत असल्याचे व्हिडीओत दिसते. या व्हिडीओरून भाजपा आणि महायुतीतील पक्षांनी पटोले यांच्यावर टीका केली आहे. विरोधकांच्या टीकेला आमदार नाना पटोले यांनी उत्तर दिले आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी यावर खुलासा केला आहे.
पत्रकार परिषदेत नाना पटोले म्हणाले, तरुण पिढीचे भविष्य बरबाद केले जात आहे. त्यावर लक्ष घालणे गरजेचे आहे. शेतकरी कर्जाच्या चिखलात फसला आहे. त्यातून त्याला बाहेर आणणे गरजेचे आहे. देशातील सावळा गोंधळही भयानक आहे. शेतकऱ्यांच्या शेतात वीज देत नाही. महाराष्ट्राने नरेंद्र मोदी आणि त्यांच्या जुमलेबाजीला नाकारले आहे. केवळ मोदी..मोदी अशी घोषणाबाजी करून काही अर्थ नाही. त्यावर आधी लक्ष देणे गरजेचे आहे.
महावितरणवर टीका
नाना पटोले यांनी महावितरणवरही टीका केली. प्रीपेड मीटरबाबत त्यांनी भाष्य केले. प्रीपेड मीटर नको असल्याचे अनेकांनी अर्ज केले आहेत. यासंदर्भात ठिकठिकाणी आंदोलन देखील सुरू आहे. त्यानंतरही सरकार जनतेचा आवाज ऐकायला तयार नाही. त्यामुळै सरकार जनतेला लुटीच्या चिखलात फसवत आहे. सरकारने आधी यावर काम केले पाहिजे. तुम्ही जनतेला मोठ्या चिखलात फसवत आहात. महाराष्ट्र लुटण्याचे काम सरकारने थांबविले पाहिजे.
‘ट्रोलिंग’ जोरात
नाना पटोले यांचे पाय धुतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी त्यांना ‘ट्रोल’ करण्यासही सुरुवात केली आहे. नाना पटोले यांच्या विरोधात सुरू असलेल्या प्रचाराला सरंजामशाही असे म्हणण्यात आले आहे. यावर देखील नाना यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, मी लोकांमधला आहे. यासाठी कोणत्याही प्रमाणपत्रांची गरज नाही. पैसे देऊन प्रचार करायची गरज नाही. वाडेगाव येथे घडलेली घटना लपविलेली नाही. कार्यकर्ता वरून पाणी ओतत होता.
योजनेवर टीका
पाय धुण्याच्या बाबत पटोले यांनी सरकारच्या ‘हर घर नल’ योजनेवर टीका केली. ते म्हणाले. ‘हर घर नल’ योजना तिथे नव्हती. तेथे नळ असते तर नळाचे पाणी पायावर घेतले असते. मी शेतकरी आहे. आपण शेतकरी शेतकरी असल्याने आपल्या चिखलाची सवय आहे. चिखल होता म्हणून पालखीचे दर्शन घेतले नसते असे होऊ शकत नाही. आपण राजा किंवा हुकुमशाह नाही. सोनाचा चमचा घेऊन आपण जन्माला आलेलो नाही, असे पटोले यांनी नमूद केले.
अकोला अन् वाद
नाना पटोले अकोल्यात आल्यानंतर वाद निर्माण होण्याचा हा दुसरा प्रसंग आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीसाठी पटोले अकोल्यात आले होते. त्यावेळी त्यांनी माजी खासदार संजय धोत्रे यांच्यासंदर्भात एक विधान केले होते. यावरून भाजपने त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पाय धुतल्याचा वादही अकोला जिल्ह्यातच झाला आहे. त्यामुळे नाना, अकोला आणि वाद असा योगायोग पुन्हा जुळून आला आहे.