Amravati : अमरावती येथे ‘जानी दुश्मन ‘ म्हणून ओळख असलेल्या आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वैरभाव पुन्हा उफाळून आला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. निवडणूक संपली असली तरी त्याची धग कायम आहे. नवनीत राणा यांना पराभूत करण्यासाठी थेट मातोश्री वरुन रसद पुरविण्यात आल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. तर खोटे आणि बिनबुडाचे आरोप करणा-या रवी राणा यांना न्यायालयात खेचण्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.
राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न
नवनीत राणा यांच्या पराभवानंतर आपली भूमिका रवी राणा यांनी पत्रकार परिषदेत मांडली. विरोधकांनी खोटा प्रचार केला. जनमानसात भीतीचे आणि संशयाचे वातावरण निर्माण केले. पराभवाला विरोधकांनी एकत्रित येऊन केलेले प्रयत्न कारणीभूत आहेत, हा राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला.
स्वार्थी डाव यशस्वी:
नवनीत राणा यांच्या पराभवाचे मतदार संघातील जनता सक्षम लोकप्रतिनिधी ला मुकली आहे. जिल्ह्यातील विकास थांबविला गेला, आता विकासाचे बाबतीत जिल्हा वीस वर्षे मागे गेला आहे. राजकीय नेत्यांचा स्वार्थी डाव यशस्वी झाला आहे. नवनीत राणा विजयी झाल्या असत्या तर केंद्रीत कॅबिनेट मंत्री झाल्या असत्या तर जिल्ह्याचा विकास जोमाने झाला असता. अशी मनातील भावना त्यांनी बोलून दाखवली.
निवडणूकीचा तमाशा केला
अचलपूर मतदार संघाचे आमदार बच्चू कडू यांनी या निवडणुकीत जो खेळ केला तो तमाशा होता. हा तमाशा करण्यासाठी त्यांनी कुठून वसुली केली असा सवाल रवी राणा यांनी उपस्थित केला. या वसुलीबाज, सुपारीबाज आमदाराला मतदार संघातील जनता उत्तर मागेल असेही त्यांनी नमूद केले. नवनीत राणा यांना पाडण्यासाठी मातोश्री वरुन रसद पुरविण्यात आली असा सनसनाटी आरोपही त्यांनी केला.
आघाडी नेत्यांना प्रशस्तीपत्र
या निवडणुकीत काँग्रेस चे नेते, कार्यकर्ते यांनी पक्षाशी ईमान राखून काम केले, त्यामुळे काँग्रेसला हे यश मिळवता आले. अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली. यशोमती ठाकूर, सुनील देशमुख, बबलू देशमुख यांच्या नावाचा त्यांनी उल्लेख केला. संजय खोडके यांनी मात्र वेगळीच शिट्टी वाजवली हे नमूद करायला ते विसरले नाहीत.
जनतेला पडलेला प्रश्न
नवनीत राणा यांच्या धडाकेबाज कार्यपद्धती प्रमाणे नवीन खासदार लोकसभेत आपला ठसा उमटवू शकेल काय असा प्रश्न जनतेला पडला आहे. आता मतदार संघातील विकास कसा होईल या चिंतेत जनता आहे. नवनीत राणा यांचा पराभव रवी राणा यांच्या किती जिव्हारी लागला आहे याची त्यांचे विधानावरून कल्पना येते.
निर्णय मान्य, आत्मचिंतन करु..
लोकशाहीत जनतेचा निर्णय सर्वोपरी असतो. तो आपणास मान्य आहे, त्यावर आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करु असे ते म्हणाले. आपल्या कार्यकाळात नवनीत राणा यांनी विकासाला चालना दिली, रखडलेले मोठे प्रकल्प मार्गी लावले, मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क ठेवला तरी ही अपयश का हा चिंतनाचा विषय आहे. अशी मनातील सल त्यांनी बोलून दाखवली.
आता नंबर माझा, नेत्यांच्या बोंबा….
लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांचा पराभव झाल्यानंतर आता नंबर माझा अशा बोंबा काही नेते मंडळी मारत आहेत. आपला नेत्यांवर नव्हे तर जनतेवर विश्वास आहे असे त्यांनी नमूद केले. बडनेरा विधानसभा मतदारसंघाची लढाई आपणच जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
न्यायालयात जाण्याचा बच्चू कडूंचा इशारा
रसद पुरविण्यात आल्याच्या आरोपाचा बच्चू कडू यांनी चांगलाच समाचार घेतला. रवी राणा बेछूट आणि बिनबुडाचे आरोप करित आहेत. त्यांच्या विरोधात दोन दिवसांत आपण न्यायालयात जाणार आहोत असे बच्चू कडू यांनी सांगितले.
नवनीत राणा यांनी सुनावले म्हणून टिका..
नवनीत राणा यांचा पराभव रवी राणा यांना अस्वस्थ करित आहे. नवनीत राणा यांनी त्यांना चांगलेच सुनावले असल्याचे दिसते अशी बोचरी टीका बच्चू कडू यांनी केली. आपण स्वबळावर निवडून आलो आहे, तुमच्यात हिंमत असेल तर निवडणूक लढून आणि जिंकून दाखवा असे प्रतिआव्हान बच्चू कडू यांनी रवी राणा यांना दिले आहे.
त्यांच्याच पक्षाने पाडले..
नवनीत राणा यांना त्यांच्याच पक्षाने पाडले. आता रवी राणा अपयशाचे खापर कोणावरही फोडत आहेत. पत्रकार परिषदेत त्यांनी माझे नांव १०८ वेळा उच्चारले. खरे तर त्यांना मानसोपचार तज्ञांना दाखविण्याची गरज आहे हे सांगायला बच्चू कडू विसरले नाहीत.
निवडणूक झाली निकाल लागले तरी अमरावती मधील राजकीय वादाला पूर्णविराम मिळाला नाही. मतदार संघाचे साम्राज्य उध्वस्त झाल्याने रवी राणा भांभावले आहेत. विधानसभा निवडणुकीत एकमेकांना धडा शिकविण्यासाठी प्रतिस्पर्धी जोमाने कामाला लागले