Vidhan Sabha : लोकसभा निवडणुकीमध्ये भंडारा गोंदियाचे माजी खासदार सुनील मेंढे पराभूत झाले. काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे यांनी खासदार मेंढेंना पराभवाची धूळ चारली. पराभवानंतर सुनील मेंढे पहिल्यांदाच माध्यमासमोर आले. मेंढेंनी माध्यमासमोर मनातील खंत व्यक्त केली.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये आपण भरीव काम केले. कुणी खासदाराने जनसंपर्क ठेवला नसेल, त्यापेक्षा अधिक ठेवला. अनेक गावांपर्यंत स्वतः पोहोचलो. मागासवर्गीय मतदारांसाठी भरीव काम केले. तरीही अपेक्षित मतदान झाले नाही. याची खंत आहे. मतदारांनी दिलेला कौल आपण स्वीकारला आहे. पराभवाची खंत मनात न ठेवता आपण पुन्हा नव्या उमेदीने काम करू. पक्ष देईल तो आदेश पाळून येत्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवू, असा विश्वास माजी खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केला.
निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, मतदारसंघातील लाखो मतदारांच्या निर्णयाचा आपण आदरच करतो. असे असले तरी आलेला निकाल आश्चर्यचकीत करणारा आहे. आम्ही सर्वांनी मिळून काम केले. मात्र, अपेक्षित यश आले नाही. ज्या विषयाशी संबंध नव्हता, तो अपप्रचार विरोधकांनी केला. त्यात ते यशस्वी झाले. आपला मुळ सामाजिक कार्यकर्त्याचा आहे. त्यामुळे पराभव झाला म्हणून थांबणार नाही. काम करतच राहणार आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपाचे व मित्र पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे भंडारा जिलह्यातील विकासाचा मार्ग कुणीही थांबवू शकणार नाही. त्यासाठी आपण भविष्यात पूर्ण ताकदीने कार्यरत राहणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
कोणताही प्रकल्प थांबणार नाही
आपला पराभव झाला असला तरी केंद्रात भाजपाचे सरकार आल्याचा आनंदच आहे. आपण हाती घेतलेली सर्व कामे पूर्णत्वास जातील. सुरू असलेली कामेही पूर्ण होतील. त्या कामांचा पाठलाग सुरूच असल्याने कोणताही प्रकल्प थांबणार नाही, याचा विश्वास यामुळे वाढल्याचे ते म्हणाले. पुढेही विकासकामे करित राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आता तयारी विधानसभेची
लोकसभेत आपला पराभव झाला असला तरी आपण खचून गेलेलो नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवू, असा विश्वास माजी खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केला. ज्या त्रुट्या राहिल्या त्याचे चिंतन करू. त्यात सुधारणा करून कामाला लागू. पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडू, असे मेंढे म्हणाले. मात्र येत्या विधानसभा निवडणुकीत सातही विधानसभेत भरघोष मते घेऊन विजय मिळवू, असा असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.