संपादकीय

Bhandara Gondia : नानांचा विजय, रोखणार का ‘सेवक’?

Vidhan Sabha : नानांच्या साकोली मतदारसंघावर भाजपचा डोळा

 

Political: लोकसभेनंतर लगेचच विधानसभेचा उत्सव रंगत आहे. दरम्यान भंडारा जिल्हा हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गृह जिल्हा असल्याने राज्याचे लक्ष भंडारा जिल्हावर लागले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असणारा आहे. 2019 मधील या मतदारसंघातील लढत संपूर्ण महाराष्ट्रासाठी लक्षवेधी ठरली होती. यंदाही भाजपने त्यांच्यासाठी आतापासूनच फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. पटोले जोरदार बॅटिंगच्या तयारीत असले तरी त्यांचा बॉल अडविण्यासाठी भाजपने क्षेत्ररक्षक शोधणे सुरू केले आहे. त्यामुळे पटोले यांना ही फिल्डिंग तोडताना बरेच कसब दाखवावे लागणार आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात डॉ. प्रशांत पडोळे यांचा झालेला विजय नाना पटोले यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. कार्यकर्त्यांच्या भावना डावलून त्यांनी डॉ. पडोळेंना उमेदवारी दिली. विजयही मिळवून दिला. यामुळे भाजपचे मनसुबे खच्ची झाले आहेत. तरीही विधानसभा निवडणुकीत नाना पटोले यांचा विजयाचा अश्व रोखण्यासाठी भाजपने आतापासूनच कंबर कसली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे गृहक्षेत्र असलेल्या विधानसभा मतदार संघातील आगामी निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

फेररचनेपूर्वी साकोली तालुका लाखांदूर मतदारसंघात होता. लाखनी-अड्याळ हा स्वतंत्र मतदारसंघ होता. 2009 च्या निवडणुकीपासून साकोली, लाखांदूर आणि लाखनी हे तीन तालुके या मतदारसंघात आल्याने अनेकांचे राजकीय गणित बिघडले आहे. सेवक वाघाये हे त्यापैकी एक आहेत. त्यांचा हक्काचा मतदारसंघ साकोलीत गेला. नाना पटोले आणि सेवक वाघाये हे दोन्ही महत्त्वाकांक्षी नेते एकाच मतदारसंघात आल्यापासून या दोघांमध्ये राजकीय वाद वाढले आहेत. लोकसभेतील पराभवानंतरही त्यांचा आता पुन्हा साकोलीच्या रणावर डोळा आहे.

असा आहे इतिहास

सध्या हा मतदारसंघ काँग्रेसकडे असला तरी भाजपनेही येथे तेवढेच लक्ष ठेवून पकड राखण्याचा सतत प्रयत्न ठेवला आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांचीच या साकोली मतदारसंघावर पकड अधिक आहे. बसपाची मतेही या मतदारसंघात महत्त्वाची ठरली आहेत. 2009 च्या निवडणुकीत नाना पटोले येथून भाजपच्या तिकिटावर जिंकले. त्यांनी काँग्रेसचे सेवक वाघाये यांचा पराभव केला होता.

2014 च्या निवडणुकीत भाजपचे बाळा (राजेश) काशिवार यांनी काँग्रेसचे सेवक वाघाये यांचा पराभव केला. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसकडून नाना पटोले यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. या निवडणुकीत सेवक वाघाये वंचित बहुजन आघाडीकडून लढले होते. ते तिसऱ्या स्थानी राहिले, माजी आमदार सेवक वाघाये यांचे नाना पटोले यांच्यासोबत संबंध मोठ्या प्रमाणावर ताणले आहेत. या मतदारसंघात बसपाचीही बऱ्यापैकी व्होट बँक आहे.

Mumbai News : ईव्हीएम अनलॉक करणारा फोन खासदाराच्या मेहुण्याकडे?

या घडामोडी भाजप लोकसभेचा वचपा काढण्यासाठी आतापासून साकोली मतदारसंघावर लक्ष ठेवून आहे. नानांना चित करण्यासाठी भाजप या मतदारसंघावर मास्टर प्लॅन करत असल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नानांचा विजयरथ रोखण्यासाठी भाजप ‘सेवका’चा उपयोग करणार असल्याचे राजकीय जाणकार सांगू लागले आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!