EVM Vs Mobail : लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर -पश्चिम लोकसभा मतदार संघात आता आणखीन एक ट्विस्ट समोर आला आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात मतमोजणीच्या दिवशी रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकाने ईव्हीएम अनलॉक करणाऱ्या फोनचा वापर केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी एफआरआय नोंदवला होता. याठिकाणी निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागलेला असला तरी, एका मागोमाग एक खळबळजनक बाबी समोर येत आहेत.
मुंबई उत्तर -पश्चिम लोकसभा मतदार संघात बिग फाईट झाली होती. शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. त्यात कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला. पण हा निकाल उद्धव ठाकरे गटाने अजून ही स्वीकारलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाईची तयारी ठाकरे सेनेने सुरु केली आहे. त्याचवेळी या प्रकरणात एक मोठा ट्वीस्ट आला आहे. त्यावरुन आता मोठे वादंग उठले आहे.
खासदार वायकरांच्या मेहुण्याने मतमोजणी केंद्रात वापरलेला फोन ईव्हीएम मशीनला जोडलेला होता. याच मोबाईलवर आलेल्या OTP ने EVM मशीन अनलॉक करण्यात आली होती. पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांनी वायकरांचे मेहुणे मंगेश पंडीलकर यांना मतमोजणी केंद्रात आपला फोन वापरायला दिल्याचा आरोप आहे. मतमोजणी केंद्रात फोनच्या वापराला मनाई असताना हा प्रकार घडला. 4 जून रोजी नेस्को सेंटरमध्ये हा प्रकार घडला होता. पोलिसांनी हा फोन जप्त केला आहे. तो आता न्यायवैद्यकीय चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. फोनवरील बोटांचे ठसे घेतले जाणार आहेत. प्रकरणात गुरव आणि पंडीलकर यांना 41(अ) ची नोटीस बजावली आहे.
मतमोजणीबाबत ठाकरे सेनेचे अमोल कीर्तिकर यांनी आक्षेप नोंदविला होता. त्यानंतर रवींद्र वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्या विरोधात वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या मतदारसंघातील निकाल लागला असला तरी अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.
निवडणूक आयोगाने दिलं उत्तर
आता निवडणूक आयोगाने या सर्व घटनाक्रमावर उत्तर दिलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या रिटर्निंग ऑफिसर वंदना सुर्यवंशी म्हणाल्या की, ईव्हिएम स्टँड अलोन डिवाईस आहे, त्यात कुठलीही वायर आणि वायरलेस प्रोव्हिजन नाहीत. ईव्हिएम अनलॉक करायला ओटीपी लागत नाही. त्यामुळे ही बातमी धांदात खोटी असल्याचे रिर्टनिंग ऑफिसर यांनी म्हटले आहे. ही अत्यंत चुकीची बातमी आहे.
कोणतीही तपासणी न करता बातमी दिल्याबदद्ल आम्ही त्या माध्यमाला नोटीसही बजावली आहे. सेक्सन 499 बदनामी आणि 505 अफवा पसरवल्या प्रकरणी तक्रार दाखल केल्याचेही रिर्टनिंग ऑफिसरने सांगितले. तसेच गुरव यांच्या जवळ असलेला फोन वायकर यांच्या नातेवाईकांकडे कसा सापडला? हा चौकशीचा भाग आहे. आणि गुरवने जो मोबाईल त्यांना दिला होता तो कोणत्या कंपनीचा होता हे पोलीसच सांगू शकतात. पण आम्ही त्याच्यावर एफआयआर नोंदविला आहे आणि त्याला निलंबित केले आहे, असे रिर्टनिग ऑफिसर यांनी सांगितले.