Delhi : दिल्लीत तापमान प्रचंड वाढले आहे. अशा परिस्थितीत सामान्य दिवसांपेक्षा पाण्याची मागणी जास्त असते. काही राज्यांप्रमाणे दिल्लीलाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. टँकरचे पाणी घेण्यासाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत असून, पाण्यासाठी झगडावे लागत आहे. दिल्लीतील आम आदमी पार्टीच्या नेत्या तथा जलमंत्री आतिशी मारलेना यांनी अनेकवेळा दिल्लीतील जनतेसाठी यूपी आणि हरियाणा सरकारकडे पाणी सोडण्याची मागणी केली आहे. दरम्यान, उत्तर पश्चिम दिल्लीतील भाजप खासदार योगेंद्र चंडोलिया दिल्ली सरकारवर निशाणा साधत म्हणाले की, आतिशी मारालेना यांचे काम फक्त खोटे बोलणे आहे.
दिल्लीतील वीज खंडित होण्यासाठी देखील आतिशी यांनी उत्तर प्रदेश पॉवर स्टेशनच्या अपयशाला जबाबदार ठरविले आहे. सोबतच हरियाणा सरकारवर आरोप केला. जाणीवपूर्वक आणि बेकायदेशीरपणे राजधानीचा पाणीपुरवठा थांबविला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
सडेतोड उत्तर देताना आरोप फेटाळले
आतिशिंच्या आरोपांवर योगेंद्र चंदोलिया म्हणाले की, “890 क्युसेक पाणी सोडण्याचा करार हरियाणा सरकार आणि दिल्ली सरकारमध्ये आहे. हरियाणा दिल्लीला सातत्याने 1049 क्युसेक पाणी देत आहे. टँकर माफिया येथून पाणी भरायचे. वीरेंद्र सचदेवा आणि मी याबाबत तक्रार केली होती. 1049 क्युसेक पाणी दिल्लीकरांसाठी वापरण्यात येणार होते. दिल्ली सरकारचे पाच जलशुद्धीकरण केंद्र आहेत. वजिराबाद येथील जलशुद्धीकरण केंद्राची 250 एमजीडी साठविण्याची क्षमता आहे. 2013 मध्ये, दिल्ली सरकारने त्यातील गाळ काढण्यासाठी निविदा काढली. असे चंदोलिया म्हणाले.
आज 11 वर्षे झाली, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही काम सुरू झाले नाही. 94 टक्के गाळ आहे. आणि केवळ 15 टक्के पाणी आहे. भ्रष्टाचारामुळे त्यांनी ज्याला टेंडर द्यायचे होते, त्याला टेंडर दिले नाही, तर दुसऱ्या पक्षाला दिले. ते न्यायालयात गेले आणि न्यायालयाने त्यांचा आदेश रद्द केला. मात्र काम सुरू होऊ शकले नाही. दिल्लीतील जनता 10 वर्षांपासून पाण्यासाठी तळमळत आहे. दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी फक्त खोटे बोलण्याचे काम करतात. 2013 पर्यंत दिल्ली जल बोर्ड नफ्यात होते. आज ते 82 हजार कोटींच्या तोट्यात चालले आहे. टँकर माफियांच्या माध्यमातून सर्व पैसा शक्तिशाली लोकांपर्यंत पोहोचवला आहे. आतिशी यांनी हरियाणाची बदनामी थांबवावी. असे चंदोलिया म्हणाले.