(या लेखात प्रकाशित झालेली मते ही लेखकांची आहे. या मतांशी द लोकहित सहमत असेलच असे नाही)
Lok Sabha Election : यावेळी लोकसभा निवडणूक नेहमीपेक्षा अफलातून आणि चुरशीची ठरली. अमरावती, बारामती आणि बीड लोकसभा मतदारसंघ निवडणुकीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या तीन मतदार संघात महायुतीच्या मातब्बर महिला नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला. यात बारामतीतून पराभूत सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागली. पण बीड ज्यांचा गड मानला जातो त्या पंकजा मुंडे आणि थेट उद्धव ठाकरेंशी वैर घेणाऱ्या नवनीत राणा या दोन्ही दिग्गज नेत्यांचं काय? हा प्रश्न आता दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना पडलाय.
बीड मध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव हा महायुतीला बसलेला सर्वात मोठा धक्का मानला जातो. बीडमध्ये प्रतिस्पर्धी बजरंग सोनवणे या उमेदवाराने वेळ ओळखून चाल खेळली. त्यांच्या विजयात मनोज जरांगे यांचा मोठा सहभाग राहिला, हे सत्य लपून राहिलेले नाही.
बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा मार्ग प्रशस्त झाला आणि सुनेत्रा पवार यांना दारुण पराभव पत्करावा लागला.
अमरावतीत नवनीत राणा यांना सुरूवातीपासूनच विरोधाचा सामना करावा लागला. त्यांना पराभूत करण्याचे चहुबाजूंनी प्रयत्न झाले. पती रवी राणा यांच्या विषयी भाजपात असलेल्या नाराजीने विरोध तीव्र झाला. प्रहारच्या बच्चू कडू यांनी तर नवनीत राणा यांच्या पराजयाची शपथच घेतली होती. पारडे फिरले, मतदार संघात चांगले बस्तान बसविण्यात यशस्वी झालेल्या नवनीत राणा निवडणूक हरल्या.
राणांना अतिआत्मविश्वास नडला
अमरावती लोकसभा मतदारसंघात आपल्या वर्चस्वाला कोणीच धक्का पोहचू शकत नाही, वाट सुकर आहे. असा अतिआत्मविश्वास रवी राणा यांना होता. बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या रवी राणा यांनी जनतेची नाडी ओळखून राजकारण केले. अत्यावश्यक वस्तूंची प्रेमळ भेट वेळोवेळी देऊन जनतेला आपलेसे केले. नवनीत राणा पतीच्या पाऊल वाटेने चालल्या. मेळघाट तसेच दुर्गम भागातील महिलांना आपलेसे करून त्यांच्यात रमल्या. या ‘भाभी’ विषयी या पट्ट्यात अजूनही आत्मियता आहे.
निकालाआधीच इंदौरचा विजयी रथ मागविला
अमरावती मतदारसंघात आपलाच विजय निश्चित आहे, हे गृहीत धरून विजयी मिरवणुकीसाठी इंदोरवरून खास रथ तयार करून आणला होता. मतदारांचे तोंड गोड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाडू मागविण्यात आले होते. आनंदावर विरजण पडल्याने त्याची गरज पडली नाही.
बच्चू कडूंशी अरेरावी अंगलट
या निवडणुकीत बच्चू कडू मविआसाठी नायक तर भाजप प्रणित महायुतीसाठी खलनायक ठरले. नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर रवी राणाची अरेरावी वाढली. युतीतील घटक पक्ष असल्याने तुम्हाला नवनीत राणा यांचा प्रचार करावाच लागेल, असे फर्मान त्यांनी सोडले. तिथेच मिठाचा खडा पडला. आणि बच्चू कडू नवनीत राणा यांच्या पराभवासाठी पेटून उठले. आपला शब्द खरा केला. नवनीत राणा यांच्या पराभवासाठी त्यांचे पती रवी राणा हेच कारणीभूत ठरतील, असे बच्चू कडू सुरूवातीपासूनच म्हणत होते. त्यात तथ्य असले तरी बच्चू कडूंच्या खेळीने आपला करिश्मा दाखवलाच.
या निवडणुकीत बच्चू कडू सर्वाधिक चर्चेत राहिले. नवनीत राणा पराभूत होतील. प्रहारचाच उमेदवार विजयी होईल, असा माहौल त्यांनी निर्माण केला होता. प्रचारसभेचे मैदान अचानक रद्द केल्यानंतर त्यांनी रॅली काढून केलेले शक्ती प्रदर्शन लक्षवेधी ठरले होते. प्रहारचे दिनेश बुब फारसे प्रभावी ठरले नसले तरी नवनीत राणा यांना पाडण्यात यशस्वी ठरले.
अमरावती मतदारसंघाचे साम्राज्य हातून अलगद निसटले. या धक्क्यातून नवनीत राणा अजून पुरत्या सावरलेल्या नाहीत. राज्यसभेच्या जागेसाठी ‘फिल्डिंग’ लावून पाहिली. स्पर्धक बघून त्यांचा हिरमोड झाला. पराभवानंतर त्या पहिल्यांदा प्रसार माध्यमांशी बोलल्या. बच्चू कडू, उध्दव ठाकरे, संजय राऊतांवर टिकेची राळ उडवली.
पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत..
लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांचेसाठी सत्तेचा राजमार्ग खुला केला. त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे. बहुदा त्या मंत्री होण्याची शक्यता वर्तवली जाते. सर्वच त्यांच्या सारख्या भाग्यवान नाहीत.
पंकजा मुंडे, प्रितम मुंडे आणि नवनीत राणा यांना आपल्या राजकीय भवितव्याची काळजी पडली आहे. पंकजा मुंडे यांचे बाबत पक्षात गांभीर्याने विचार सुरू आहे. लवकरच त्यांना महत्वाचे पद मिळण्याची शक्यता आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची मेहेर नजर नवनीत राणा यांचेवर असल्याने त्यांचेवर पक्षाच्या महत्वाच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात येईल अशी माहिती आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता प्रचार यंत्रणेत त्यांना महत्वाचे स्थान मिळेल असे दिसते.
संसदेतील कामगिरी, पक्षाची भूमिका मांडताना दिसलेली वक्तृत्वाची चुणूक, उद्धव ठाकरेंशी घेतलेला पंगा या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. किमान पुढच्या निवडणुकीपर्यंत त्यांना कोणत्या जबाबदारीत गुंतवून ठेवायचे याची चाचपणी सुरू आहे.