महाराष्ट्र

Bhandara Gondia : पडोळेंच्या विजयामुळे आमदार झाले अस्वस्थ !

Vidhan Sabha Election : पराभवामुळे आली आत्मपरीक्षणाची वेळ.

Gondia : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव हा तालुका काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांना विजय मिळवून देणारा ठरला आहे. तब्बल 15 जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये डॉ प्रशांत पडोळे यांनी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघातील आजी-माजी आमदारांना विचार मंथन करण्यास भाग पडले आहे.

अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सात, सडक अर्जुनी तालुक्यातील पाच आणि गोरेगाव तालुक्यातील तीन, अशा एकूण 15 जिल्हा परिषद सर्कलमधून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांनी आघाडी घेतली. तर भाजपाचे सुनील मेंढे यांना केवळ महागाव जिल्हा परिषद क्षेत्रातून 321 मतांची आघाडी घेतल्याचे स्पष्ट झाले. आजी-माजी आमदारांची जोडी अन् दिग्गज नेत्यांची फळी असतानासुद्धा भाजप उमेदवाराच्या पराभवाने त्यांच्यावर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

दोन वर्षात भाजपाचे वर्चस्व

अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन विधानसभा निवडणुकांत भाजपाचे वर्चस्व राहिले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी भाजपाचे राजकुमार बडोले यांचा पराभव केला होता. बडोले पराभूत झाले असले तरी त्यांनी मतदारसंघात आपला जनसंपर्क पूर्वीसारखाच कायम ठेवला होता. तालुक्यातील सहकार क्षेत्रातील निवडणुकीत त्यांच्या मार्गदर्शनातून सत्ता कायम ठेवली. लोकसभेच्या निकालावरून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आपली दावेदारी पुढे करून जनाधार वाढविण्याचा प्रयत्न करु शकते.

दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यात भाजपाला चांगले यश मिळाले होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे लढले होते. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सात जिल्हा परिषद सर्कलमधून भाजपाने तीन जागांवर, काँग्रेसने दोन, राष्ट्रवादीने एक तर भाजप समर्पित एक अपक्ष असे उमेदवार विजयी झाले होते.

लोकसभेतील विजयामुळे काँग्रेस पक्षात नवचैतन्य आहे. तर भाजपात संशयकल्लोळ आहे. विद्यमान आमदारांना हमखास उमेदवारी मिळण्याची आशा आहे. एकंदरीत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघासाठी गुडघ्याला बाशींग बांधून राजकीय तोरणात अनेक जण सज्ज आहेत. तर काहींना आतापासूनच आमदारकीचे डोहाळे लागले आहेत.

Vijay Wadettiwar : फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने विश्वासार्हता गमावली !

निवडणूक होईल रंगतदार..

लोकसभेचा पराभव भाजपाला जिव्हारी लागला. तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी आजही बूथनिहाय गोळाबेरीज करून मंथन करीत आहेत. मागील विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाचा निसटता पराभव झाला होता. त्याची आणि लोकसभेतील पराभवाची सल भाजपा काढणार का, असा प्रश्न राजकीय जाणकारांना पडला आहे. त्यामुळे येणारी मोरगाव विधानसभेची निवडणूक रंगतदार ठरेल, यात शंका नाही.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!