Vidhan Sabha : लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र विधानसभेच्या दोन आमदारांनी राजीनामा दिला आहे. लवकरच आणखी चार आमदार राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. आमदार असताना खासदार म्हणून निवडून आल्यानंतर आमदारांना 20 जूनपर्यंत राजीनामा द्यावा लागणार आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर आणि बळवंत वानखेडे यांनी राजीनामा दिला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी करत महायुतीला जबर धक्का दिला आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी काँग्रेसने 13 जागा जिंकल्या आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती करून निवडणूक लढवली होती. महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या नुकसानाचा अंदाजही भाजप आणि मित्रपक्षांना नव्हता. 2019 मध्ये काँग्रेसने जिंकलेल्या एकमेव जागेवर चंद्रपूरमध्ये यंदा काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी विजय मिळवला आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून निवडून आलेले 48 खासदार आता दिल्ली दरबारात आवाज उठवणार आहेत. 18व्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 30 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. तर महायुतीचे 17 उमेदवार विजयी झाले आहेत. सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी झाले आहेत. त्यांनीही काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. आता 48 नवनिर्वाचित खासदार संसदेत जाणार आहेत. मात्र, या 48 खासदारांपैकी 7 विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे या सर्व आमदारांना राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यांपैकी 3 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे दिले आहेत.
या आमदारांचे राजीनामे बाकी..
आमदार रवींद्र वायकर (शिवसेना शिंदे गट), आमदार वर्षा गायकवाड आणि संदिपान भुमरे यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने अनेक आमदार उभे केले होते. निवडणुकीत अनेक नेत्यांनी विजयाची पताका फडकवली. आता खासदार झालेल्या आमदारांना आमदारपद सोडावे लागणार आहे.