राज्यात चार जागांसाठी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 26 जून रोजी मतदान होणार असून या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांनी आपले प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात उतरवले. मात्र यानंतर दोन्ही पक्षांनी मोठा निर्णय घेत आपापले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून माघारी घेतले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अंतर्गत सुरू असलेली धूस-फूस दोघांच्या या निर्णयामुळे काही प्रमाणात शांत झाली आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या चार रिक्त जागांसाठी निवडणूक होत आहे. 26 जून रोजी मतदान होणार आहे. आज 12 जून रोजी उमेदवार अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेनेने चारही मतदारसंघातून उमेदवार दिले. तर काँग्रेसने कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून उमेदवार दिले होते. आत कोकण पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार संजय मोरे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. कोकण पदवीधर मतदारसंघातून आता महायुतीकडून भाजपचे निरंजन डावखरे हे उमेदवार असणार आहेत. तर दुसरीकडे कोकण पदवीधर निवडणुकीतून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने माघार घेत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कुरबुर होताना दिसून येत होती. महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांविरुद्ध उभी ठाकल्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, उद्धव ठाकरेंनी एका जागेवरून उमेदवार मागे घेतला, तर काँग्रेसनेही एका मतदारसंघातून माघार घेतल्याने महाविकास आघाडीतील जागांबद्दलचा कलह शमल्याचे दिसत आहे.
प्रत्येक चर्चेत उद्धव ठाकरेंची गरज नाही : राऊत
‘कोकण पदवीधरची जागा ही काँग्रेसला मिळत आहे. काल रात्री आमची याबाबत चर्चा झाली. त्यात नाना पटोले देखील सहभागी होते. प्रत्येक चर्चेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणलेच पाहिजे असे नाही. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही काम करतो. त्यानुसार किशोर जैन यांचे उमेदवारी आम्ही मागे घेतली आहे,’ असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले
*कोकण पदवीधर मतदारसंघातील उमेदवार*
निरंजन डावखरे (भाजप)
किशोर जैन (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) – अर्ज मागे
रमेश कीर (काँग्रेस)
संजय मोरे (शिवसेना) – अर्ज मागे
अमित सरैय्या (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)