Mahavikas Aghadi: सुरक्षा रक्षकांच्या नावावर 32 लाख रुपयांची खोटी बिले तयार करण्यात आली. या बिलांना मंजुरी दिल्याचे प्रकरण तापले आहे. याप्रकरणी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि 12 संचालकांसह 4 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्व संचालक मंडळ फरार झाले. सध्या या बाजार समितीवर माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या, कोट्यवधींची आर्थिक उलाढाल असलेली ही समिती आहे. संवेदनशील असलेल्या खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 18 संचालक आहेत. निवडीत 2023 मध्ये माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी पुन्हा सत्ता काबीज केली. बाजार समितीच्या सभापतिपदी सुभाष पेसोडे तर उपसभापतिपदी संघपाल जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
काँग्रेसचा जोर
बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दरवेळेस प्रमाणे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांची सत्ता आली. महाविकास आघाडीने 18 पैकी 15 जागांवर दणदणीत विजय प्राप्त केला. बाजार समितीवर आपला झेंडा रोवला. वर्षभराच्या कार्यकाळात भाजपाने बाजार समितीच्या सत्ताधाऱ्यांना नाकी नऊ आणले. अनियमिततेच्या प्रकरणात यापूर्वी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्यासह सभापती व संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर आता सुरक्षा रक्षकांच्या नावावर खोटे बिले तयार झालेत. त्यात 32 लाखाचा अपहार केल्याच्या तक्रारी झाली.
यात सभापती सुभाष पेसोडे यांच्यासह माविआच्या एकूण 12 संचालकांसह 4 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आरोपींमध्ये सभापती सुभाष पेसोडे यांच्यासह संचालक गणेश संभाजी माने, गणेश मनोहर ताठे, श्रीकृष्ण म. टिकार, विलास सिंग सुभाषसिंग इंगळे, प्रमोद शामराव चिंचोळकर आहेत. संजय रमेश झुनझुनवाला, मंगेश नामदेव इंगळे , सचिन नामदेव वानखेडे, हिम्मत रामा कोकरे, सुलोचना श्रीकांत वानखेडे, वैशाली मुजुमले यांचीही नावे आहेत. बाजार समितीचे सचिव गजानन आमले, कर्मचारी प्रशांत विश्वपालसिंग जाधव, विजय इंगळे आणि कॅशियर गिरीश सातव यांचाही समावेश आहे.
Sadabhau Khot : आयाराम-गयारामांचे लाड ; आमचा उपयोग लढण्यासाठीच?
याआधीही बरखास्ती
इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे अपहार प्रकरणात 2019 मध्ये खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळांचे रद्द झाले. शासनाने बाजार समितीत प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी या प्रकरणामुळे देखील खळबळ उडाली होती. ही बाजार समिती काँग्रेस-भारिप बहुजन महासंघ यांच्या ताब्यात होती. मात्र, या बाजार समितीमधील भ्रष्टाचार आणि होत असलेल्या तक्रारीत तथ्य आढळले. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी खामगाव बाजार समितीचे अधिक्रमण केली. संचालक मंडळ बरखास्त करण्याचा आदेश दिला. बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती केली होती.