Political War : लोकसभेत दारुण पराभवाचा सामना करावा लागलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सध्या चौफेर टोलेबाजी सुरू आहे. कोल्हापुरात लागलेल्या एका बॅनरने तर राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात कशीबशी एकच जागा जिंकणाऱ्या अजित पवार यांच्या जखमेवर आता शरद पवार गटाकडून चांगलेच मीठ चोळले जात आहे.
काका शरद पवारांकडून पक्ष आणि चिन्ह हिसकावून ‘महाशक्ती’ भाजपाची संगत घेणाऱ्या अजित पवारांवर लोकसभेत चांगलीच नामुष्की ओढवली. पुतण्याने पक्ष फोडून दिग्गजांना सोबत नेऊन शरद पवारांची कोंडी करू पाहिली. पण त्यात स्वतःच अजित पवार अडकले. महाविकास आघाडीकडून 10 जागा लढणाऱ्या शरद पवारांनी तब्बल 8 जागांवर विजय मिळवला तर अजित पवारांना मात्र एकाच जागेवर समाधानी व्हावे लागले. भाजपकडून प्रतिष्ठेची केलेल्या बारामतीतही अजित पवारांनी बहीण सुप्रिया सुळेंविरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे करावे लागले. त्यात त्यांना लाजिरवाणा दारुण पराभव स्वीकारावा लागला. एकूणच अजित पवारांच्या या अवस्थेला आता टिंगल टवाळीचा विषय म्हणून पहिले जाऊ लागले आहे.
डिवचणारी फलकबाजी
कोल्हापुरातील दाभोळकर चौक सध्या यामुळे चर्चेत आहे. परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहेत. बॅनरद्वारे अजित पवार यांच्या जखमेवर मीठ चोळण्यात आले आहे. ‘सुजल्यावरच कळतंय, शरद पवारांनी मारलय कुठं..’ ही अवघी एक ओळ या बॅनरवर आहे. मात्र यातून अजित पवार यांना टार्गेट करण्यात आले. हिच चर्चा आता होऊ लागली आहे. नागरिकांमध्ये या ओळीची खास हास्यजत्रा आहे. बॅनरवर एका बाजूला शरद पवार यांचा फोटो तर दुसरीकडे ही ओळ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
बारामतीतून सुरुंग
बारामती लोकसभा मतदारसंघ हा हाय वोल्टेज मतदारसंघ ठरला. मतदारसंघात एकाच घरातील दोघेजण एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यात जंगी फाईट झाली. हा पराभव अजित पवारांनी निकालाच्याच दिवशी मान्य केला. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा पराभवाची जबाबदारी स्वीकारली. 11 मिनिटांच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी “बारामतीत मीच कमी पडलो” हे वाक्य सहावेळा उच्चारले. .
बारामतीतही फलक
बारामतीमधील सुपामध्ये बॅनर लागले आहेत. येथे ‘वादा तोच दादा नवा’, असे बॅनर्स लावले आहे. सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बारामतीमधील सुपा येथे बॅनरबाजी करण्यात आली आहे. “हर वाल का पलटवार हुं मै, युही नही कहलाता शरद पवार हुं मै ” असे वाक्य लिहून सुप्रिया सुळे यांना चौथ्यांदा विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.