प्रशासन

Crop Scam : धान्यावर अधिकाऱ्यांचा डल्ला : दोघांना अटक

Police Action : गडचिरोलीत धान, बारदानाघोटाळा

Gadchiroli News : रक्षकच भक्षक होण्याचा प्रकार नवीन नाही. राज्याच्या शेवटच्या टोकावरील गडचिरोलीत अधिकाऱ्यांनी गरीब शेतकऱ्यांच्या धान्यावर डल्ला मारला. धान्य खरेदीत सहा कोटी रुपयांचा घोटाळा केला. ही घटना उघडकीस आली आहे. आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने खरेदी करण्यात येणाऱ्या धान्यातच अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केला. यात दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. गडचिरोली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गडचिरोली महामंडळाचे तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक यांच्यासह तत्कालिन कनिष्ठ सहाय्यकास बेड्या ठोकल्या आहेत. गजानन रमेश कोटलावार आणि व्यंकटी अंकलू बुर्ले अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने या दोघांनाही 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

केंद्र सरकारमार्फत किमान आधारभूत किंमत खरेदी योजना राबविण्यात येते. यात शेतकऱ्यांनी पिकवलेले धान्य आदिवासी विकास महामंडळामार्फत विविध खरेदी केंद्रांवर दिले जाते. या धान्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेल्या राईस मिलर्सना बँक गॅरंटीच्या प्रमाणात भरडाईसाठी वितरण केले जाते. वितरित केलेल्या धानाचे आदेश मिलर्स आणि खरेदी केंद्रांचे केंद्र प्रमुख यांच्या स्वाक्षरीने वजन पावत्यांसह उपप्रादेशिक कार्यालयास सादर केले जातात. त्यानंतर मिलर्संनी उचल केलेल्या धानाची भरडाई केली जाते. तयार केलेला तांदूळ जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या अधिनस्थ गोदामात जमा होतो.

जमा केलेल्या तांदळाच्या स्वीकृत पावत्या मिलर्सद्वारे प्रादेशिक कार्यालयात जमा करण्यात येतात. काही अधिकारी यात अपहार करीत होते. असाच प्रकार चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा (कं.) येथील धान खरेदी केंद्रावर झाला. पणन हंगाम 2022-23 मध्ये या केंद्रावर मोठा अपहार झाला. तक्रारीनंतर आदिवासी विकास महामंडळातर्फे चौकशी करण्यात आली. तक्रारीनंतर अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या. मार्कंडा केंद्रावर 59 हजार 947.60 क्विंटल धानाची खरेदी झाली होती. परंतु प्रत्यक्षात 31 हजार 532.58 क्विंटल धान्य मिलर्सना देण्यात आले होते. मिलर्सना दिलेल्या एकूण वितरण आदेशापैकी 28 हजार 415.02 क्विंटल धानाच्या हिशोबात फेरफार झाली.

Shiv Sena : अकोल्यातील पराभवावर ठाकरे गटाचे मंथन

मोठा घोळ 

प्रतिक्विंटल 2 हजार 40 रुपये याप्रमाणे 5 कोटी 79 लाख 66 हजार 640 रुपये किंमतीचा धान मिलर्सना प्राप्त झाले नाही. हे धान गोदामात देखील शिल्लक नव्हते. महामंडळातर्फे पुरविण्यात आलेल्या एकूण बारदाण्यापैकी 71 हजार 38 बारदाणे, प्रति बारदाणा 32 रुपये 76 पैसे याप्रमाणे 23 लाख 27 हजार 204 रुपयांचा अपहार करण्यात आला. धान आणि बारदाण्याचा हा घोटाळा एकूण 6 कोटी 2 लाख 93 हजार 845 रुपये किमतीचा असल्याचे चौकशीअंती समोर आले. याप्रकरणी व्यवस्थापक गजानन कोटलावार यांना ऑगस्ट 2023 मध्ये निलंबित करण्यात आले होते.

या घोटाळ्यात आता मार्कंडा (कं.) खरेदी केंद्राचे तत्कालीन केंद्र प्रमुख व्यंकटी बुर्ले, विपणन निरीक्षक राकेश मडावी, प्रभारी उपप्रादेशिक व्यवस्थापक व्ही. ए. कुंभार, तत्कालीन प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे प्रभारी प्रादेशिक व्यवस्थापकांनी आष्टी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर गजानन कोटलावार व व्यंकटी बुर्ले यांना अटक करण्यात आली.

चामोर्शी न्यायालयाने आरोपीना 15 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी राकेश सहदेव मडावी याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक राहुल आव्हाड, उपनिरीक्षक सरिता मरकाम, बालाजी सोनुने यांनी ही कारवाई केली.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!