प्रशासन

Akola ZP : खतांच्या तुटवड्यावरून घमासान

Farmer Issue : कृषी अधिकाऱ्यांना सदस्यांनी धरले धारेवर

Akola News : खरीपाचा हंगाम तोंडावर असताना कधी बियाणे कमी पडत आहेत. कधी खताचा होणारा तुटवडा शेतकऱ्यांची डोकेदुखी आणखी वाढवणार आहे. अशात अकोला जिल्हा परिषदेच्या सभेत हाच मुद्दा घेऊन चांगलेच घमासान झाले. खतांच्या तुटवड्याच्या मुद्द्यावरून सदस्यांनी कृषी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात एका विशिष्ट कंपनीच्या बियाण्यांचा मुद्दा चांगलाच तापला. बियाण्यांचा तुटवडा झाल्यानंतर शेतकऱ्यांना भर उन्हात बियाणे खरेदीसाठी रांगेत उभे राहावे लागले. अनेक ठिकाणी बियाण्यांचा काळाबाजारही झाला.

बियाणांसोबतच आता शेतकऱ्यांना खतासाठीही रांगेत उभे राहवे लागत आहे. कृषी व्यावसायिकांकडून लिंकिंग (अर्थात शेतकऱ्यांनी मागणी केलेल्या कृषी निविष्ठांसोबत त्यांना आवश्यकता नसतानाही अन्य निविष्ठा विकत घेण्यास भाग पाडणे) होत आहे. हा आरोप करीत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी कृषी विभागाला धारेवर धरले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कृषी व्यावसायिकांचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ही माहिती जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी (एडीओ) सभेत दिली.

सदस्य झाले आक्रमक

खतासाठी रेल्वेची रॅकही उपलब्ध होत नसल्याची माहिती त्यांनी दिली. 6 ते 8 कृषी व्यावसायिक कृषी विभागाच्या रडावर आहेत. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी असलेले कपाशीचे बियाणे यांना पुरेसे मिळाले नाही. शिवसेनेचे सदस्य डॉ. प्रशांत अढाऊ यांनी हा मुद्दा मांडला. शेतकऱ्यांना हव्या असलेल्या खतासाठीही त्यांच्यावर रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. कृषी विभागाचे पथक नेमके करतात काय, असा सवालही त्यांनी केला. शेतकऱ्यांना हवी असलेली खते पुरेशी मिळत नाही. त्यांना नको असलेली खते उपलब्ध आहेत. अपक्ष सदस्य गजानन पुंडकर असे म्हणाले. कृषी केंद्रात दर्शनी भागावर साठ्याबाबत फलक लावणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावर प्रभारी जिल्हा कृषी विकास अधिकारी मिलिंद जंजाळ यांनी खतांची आयुक्तालयाकडे केलेली मागणी, मंजूर साठा, उपलब्ध साठा याबाबत माहिती दिली.

Bhandara Police : धाडस करून तरूणी तक्रार द्यायली गेली, पण पोलिस अधिकाऱ्याने…

निलंबन प्रलंबित

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करून पुढील कार्यवाही एसएओंकडे प्रस्तावित करण्यात येईल, असेही जंजाळ म्हणाले. सभेला जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता आढाऊ, उपाध्यक्ष सुनील फाटकर, सभापती आम्रपाली खंडारे, माया नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, काँग्रेसचे गटनेते चंद्रशेखर चिंचोळकर, भाजपचे रायसिंग राठोड आदी उपस्थित होते.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!