Lok Sabha Results : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात कौल दिला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर एका पोस्ट मधून आंबेडकर यांनी जनादेश मान्य असल्याचे म्हटले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः निवडणूक लढवली. या निवडणुकीत आंबेडकर यांचा पराभव झाला.
महाराष्ट्रातील ज्या मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते, ते देखील पराभूत झाले आहेत. त्यामुळे मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला नाकारले, असा स्पष्ट संदेश पुढे आला आहे. मतदारांनी दिलेला हा जनादेश आंबेडकर यांनी नम्रपणे स्वीकारला आहे. ‘मी प्रत्येक VBA कार्यकर्त्याचे त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी आणि पक्षाप्रती ठोस समर्पण केल्याबद्दल आभार मानू इच्छितो’, असे आंबेडकर म्हणाले.
विजेत्यांचे अभिनंदन
वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीत विजय झालेल्या खासदारांचे अभिनंदनही केले आहे. ‘मी नवनिर्वाचित खासदारांचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचा पराभव केला.’ ‘पक्ष जिंकला नाही म्हणून मी निराश आहे. पण मी आशा सोडलेली नाही’, असे त्यांनी नमूद केले. ‘माझे सहकारी आणि मी आमच्या पराभवाच्या कारणांचे आत्मपरीक्षण करू. विश्लेषण करू आणि आगामी काळात पक्ष मजबूत करण्यासाठी काम करू’, असे आंबेडकर यांनी नमूद केले.
सुरुवातीपासून पिछाडी
प्रकाश आंबेडकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे सर्वच उमेदवार पिछाडीवर होते. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून पक्षाच्या एकाही उमेदवाराला आघाडी मिळाली नाही. प्रकाश आंबेडकर हे देखील अकोला लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर. अखेर पर्यंत त्यांचा तिसरा क्रमांक कायम राहिला. अकोला मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांनी दोन लाखांहून अधिक मतं घेतली. मात्र कोणत्याही फेरीत ते आघाडी घेऊ शकले नाहीत.
पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीचा जोर आहे. त्यामुळे आंबेडकर महाविकास आघाडी मध्ये गेल्यास निवडणुकीचा निकाल बदलू शकतो असे मानले जात होते. मात्र वंचित आणि महाविकास आघाडीचे मनोमिलन झाले नाही. त्यामुळे मतांचे विभाजन झाल्याचा आरोप पुन्हा एकदा आता होत आहे.