Government Establishment : भाजपने केवळ नरेंद्र मोदींना पुढे करून मतं मागितली. एकच एक चेहरा किती दिवस चालणार? यावेळी लोकांना मोदी नको होते. कारण त्यांनी पक्ष फोडले, ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमचे बॅंक अकाऊंट बंद केले, अशी त्यांची अनेक कारस्थानं जनता बघत होती आणि जनतेला हे अजिबात आवडले नाही. त्यामुळे जनतेने मोदी आणि भाजपला त्यांची जागा दाखवली, असे म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
बब्बर शेर कार्यकर्त्यांच कौतुक..
आज (ता. 4) पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले. ही लढाई संविधान वाचवण्यासाठी होती. देशाच्या जनतेला मी हेच सांगत होतो आणि जनतेने ते ऐकले. संविधान वाचवण्यासाठी पहिले पाऊल आता जनतेने उचलले आहे. काँग्रेसने या निवडणुकीत इंडीया आघाडीच्या सहकाऱ्यांना मान दिला. भारताला नवे व्हिजन इंडीया आघाडीने दिले. हे यश इंडीया आघाडीचे आहे, कार्यकर्त्यांचे आहे. खरंच.. बब्बर शेर कार्यकर्त्यांचे कौतुक, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांची पाठ थोपटली.
संविधान आणि आरक्षणावर भाजप सरकारने हल्ला केला होता. जनता मोदी आणि अदानींचा थेट संबंध जोडते. देशाच्या जनतेने या निकालातून स्पष्ट सांगितले की, त्यांना मोदी नको आहे, अमित शाह नको आहेत. देशाच्या जनतेवर मला अभिमान आहे. संविधान वाचवण्याचे काम या देशातील गरीब लोकांनी केले. आदिवासी, शेतकरी, शेतमजुरांनी एकत्र येऊन संविधान वाचवले. हे संविधान म्हणजे देशाचा आवाज आहे. काँग्रेसने जी आश्वासने दिली, ती आम्ही पूर्ण करणार आहोत, असेही गांधी म्हणाले.
सरकार स्थापनेबाबत सध्या काही सांगता येणार नाही. पण उद्या इंडीया आघाडीच्या नेत्यांची बैठक आहे. तेथे या विषयावर चर्चा होणार आहे. त्यानंतर पुढील दिशा ठरवली जाईल. इंडीया आघाडीचे सर्व नेते मिळून जे ठरवतील, तेच पाऊल उचलू. आम्ही सर्वकाही जर येथेच सांगितले तर नरेंद्र मोदी हुशार होऊन जातील. त्यामुळे काही गोष्टी गुपीतच राहू द्या, असे राहुल गांधी पत्रकारांना म्हणाले.
रायबरेली आणि वायनाडच्या जनतेचे मनापासून आभार. कोणत्या जागेवर मी राहावे, हे विचार करून आणि सहकाऱ्यांशी चर्चा करून ठरवेन. विरोधात बसायचे की सत्ता स्थापन करायची, याबाबत आम्ही उद्या, 5 जूनला चर्चा करू. त्यासाठी उद्या आमची बैठक आहे.
किशोरीलाल शर्मा पीए नाहीत..
किशोरीलाल शर्मा गेल्या 40 वर्षापासून अमेठीत काँग्रेस पक्षाचे काम करत आहेत. त्यांचे अमेठीच्या लोकांशी घट्ट नाते आहे. ही गोष्ट भाजपच्या लोकांना माहिती नाही. त्यामुळे ते पीए आहेत, असे म्हणत त्यांना हिणवण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपवाले लोकांना सन्मान देत नाही, ही त्यांची मोठी अडचण आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.