Tough Result : अत्यंत चुरस पूर्ण झालेल्या सामन्यांमध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे अनुप धोत्रे हे विजयी झाले आहेत. काँग्रेसचे उमेदवार अभय पाटील यांचा त्यांनी 40 हजारावर मतांनी पराभव केला. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासून अभय पाटील हे आघाडीवर होते. त्यामुळे भाजपच्या गटातील धाकधूक प्रचंड वाढली होती.
अभय पाटील यांची आघाडी अनेक फेऱ्यांपर्यंत कायम राहिली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. भाजप व कार्यकर्त्यांचे चेहरे मात्र गंभीर होते. एक्झिट पोलमध्ये अनुप धोत्रे हे विजयी होतील, असे सांगण्यात आले होते. मात्र मतमोजणीतील सुरुवातीच्या फेऱ्यांनी भाजपच्या टेन्शनमध्ये वाढ केली. मात्र कालांतराने बाजी पलटली. अनुप धोत्रे यांनी आघाडी घेतली. त्यानंतर ही आघाडी त्यांच्या विजयापर्यंत कायम राहिली.
‘साहेब’ पुढे आलेच नाहीत
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर सुरुवातीपासूनच तिसऱ्या क्रमांकावर होते. मतमोजणी मध्ये थेट लढत दोन पाटलांमध्ये सुरू होती. अभय पाटील आघाडीवर असतानाही प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर होते. अनु धोत्रे यांनी आघाडी घेतल्यानंतरही आंबेडकर यांचा क्रम बदलला नाही. दुपारच्या टप्प्यानंतर भाजपची चिंता वाढवणाऱ्या अभय पाटील यांना मागे टाकत साडेपाचच्या सुमारास अनुप धोत्रे यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.
आक्षेपाची अफवा
अकोल्यात मतमोजणी सुरू असताना त्यावर आक्षेप घेण्यात आल्याची अफवा उडाली. अभय पाटील यांनी आक्षेप नोंदवल्यामुळे मतमोजणी थांबवल्याची ही अफवा होती. मात्र काही वेळातच प्रशासनाने याचा खुलासा केला. मतमोजणी थांबलेली नव्हती, असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले.
सावरकर यांचे वजन वाढले
अनुप धोत्रे यांचे निकटवर्तीय म्हणून अकोला पूर्व मतदार संघाचे आमदार रणधीर सावरकर यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. धोत्रे यांच्या विजयामुळे आमदार सावरकर यांचे वजन आता वाढले आहे. निवडणुकीचा प्रचार सुरू असताना धोत्रे यांच्या संदर्भात विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर कटकारस्थान केले. परंतु या सर्वांवर मात करून अरुण धोत्रे यांनी विजय मिळवला आहे. अकोला जिल्हा भाजपाची पतही वाढली आहे.