Nagpur Politics : रोडकरी, पुलकरी या नावाने ओळखले जात असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सतत तिसऱ्यांदा नागपूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांचा त्यांनी पराभव केला. विजयाची हॅट्रीक साधत एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने गडकरी आघाडीवर आहेत. केवळ विजयाची घोषणाच तेवढी शिल्लक आहे.
2014 आणि 2019 मध्ये गडकरी नागपुरातून निवडून आले आहेत. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार आणि 2019 मध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांनी पराभूत केले आहे. यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेसने आमदार विकास ठाकरे यांना मैदानात उरतवले होते. विकास ठाकरे यांनी गडकरींना 2019 च्या तुलनेत चांगली टक्कर दिली. विजय मिळू शकला नाही, पण गडकरींचे मताधिक्य मात्र विकास ठाकरे यांनी नक्कीच कमी केले.
गुरु शिष्याचे नाते
गुरू-शिष्याचे त्यांचे नाते आहे. त्यामुळे 2014 मधील विलास मुत्तेवार यांच्या पराभवाचा वचपा ठाकरे काढतील, अशी चर्चा होती. काँग्रेसने तसे वातावरणही तयार केले होते. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये यावेळी चांगली एकजुट होती. शिवाय दरवेळी मतविभाजन करणारे उमेदवारीह यावळी रिंगणात नव्हते. त्यामुळे नागपूरच्या निवडणुकीत चांगली चुरस निर्माण झाली होती. विकास ठाकरे यांनी एक लाखाच्या मताधिक्याने निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला होता. काही काळ भाजपच्या गोटातही अस्वस्थता बघायला मिळाली होती.
आज सकाळी मतमोजणीला सुरूवात होताच तिन-चार फेऱ्यांमध्येच गडकरींनी जवळपास 40 हजारांची आघाडी घेतली. तेव्हाच त्यांच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. पण उत्तर नागपूर आणि पश्चिम नागपूरची मतमोजणी होईल तेव्हा आम्ही आघाडी घेऊ, असा विश्वास ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला होता. पण हा विश्वास खरा ठरला नाही. पाहता पाहता गडकरींची आघाडी एक लाखाच्या वर निघून गेली. आता गडकरींच्या विजयाची अधिकृत घोषणाच तेवढी बाकी आहे.