Mahrashtra Politics : भाजपने २०१४ आणि २०१९ मध्ये पूर्ण बहुमत मिळवले होते. पण यावेळी भाजपला ते बहुमत मिळावता आले नाही. हा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा पराभव आहे. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी खूप मेहनत घेतली. सर्वांनी मिळून मोदी शाह यांचा अहंकार उतरवला, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर तोफ डागली.
आज (ता. 4) पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, आज मोदी शाह लोकांसमोर हात-पाय जोडत आहेत. ‘आमच्या सोबत या सरकार बनवण्यासाठी…’, असे म्हणत विनवण्या करत आहेत. महाराष्ट्रात आम्ही मोदींना रोखले. मोदींनी आता राजीनामा द्यायला पाहिजे. प्रभू श्रीराम आणि बजरंगबली यांनीही त्यांना स्पष्ट संकेत दिले आहेत की आता घरी बसा. आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की, मोदी आता काय करतील.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चीम बंगाल या राज्यांनी मोदींचा पार गेम करून टाकला. त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष फोडला. त्याचा धडा महाराष्ट्रातील जनतेने त्यांना शिकवला. ते स्वतःला देव म्हणत होते. ते नकली देव आता हारले आहेत. २८ पक्ष आता एकत्र बसू आणि चर्चा करू. राहुल गांधी पंतप्रधान होतील का, असे विचारले असता. ते आत्ताच सांगता येणार नाही. पण मोदींपेक्षा राहुल गांधीचा परफॉर्मन्स चांगला आहे, असे राऊत म्हणाले.
काही जागा आम्ही गमावल्या हे खरे आहे. पण आम्ही आधीपासून महाराष्ट्रात ३० जागा जिंकू, असे सांगत होतो. तेवढ्या जागा आम्ही मिळवल्या. धनुष्यबाण चिन्ह नसल्यामुळे त्याचाही फटका आम्हाला बसला, हे मान्य करावे लागेल. सांगलीची जागा शिवसेनेने लढली. काँग्रेसला तेव्हा आमचा निर्णय मान्य झाला नाही. त्यांच्या स्थानिक नेतृत्वाने वेगळी भूमिका घेतली. तेव्हा आम्हाला वेदना झाल्या.
सांगलीच्या विषयात नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण या सगळ्यांनी स्थानिक नेतृत्वाला समजावले. यामध्ये त्यांचा दोष नाही. पण सांगलीच्या स्थानिक नेतृत्वाने ऐकले नाही. तेथे विशाल पाटील निवडून आले. हा लोकशाहीमध्ये जनतेचा कौल आहे. तो आम्हाला मान्य आहे. सांगलीमध्ये शिवसेनेचे काम सुरू आहे आणि सुरूच राहणार आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले. एनडीएचे समर्थकही हे मानतात की, आता तानाशाही चालणार नाही, असंही ते म्हणाले.