Rural Road : गावातून पक्का रस्ता असावा, अशी वाढोणावासीयांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी एका रात्रीत पूर्ण झाली. पण गुळगुळीत रस्ता पाहण्याचा आनंद मात्र क्षणभंगुर ठरला. मध्यरात्री तयार करण्यात आलेला डांबरी रस्ता सकाळीच मात्र हाताने उकरला गेल्याने गावकऱ्यांच्या आनंदाचे रुपांतर संतापात झाले. या निकृष्ट कामाबद्दल संतप्त गावकरी आता कुंपणांनीच शेत खाल्ले तर न्याय कोणाकडे मागायचा, असा प्रश्न विचारत आहेत.
मेजदा ते वाढोणा पक्का रस्ता बनण्याची मागणी असताना रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. अगदी रात्री 11 वाजता या कामाला सुरुवात करण्यात आली. सकाळी गावकरी जागे झाल्यानंतर त्यांना नवा गुळगुळीत रस्ता मिळाला आणि रस्त्यावरून वाहतूक देखील सुरू झाली. मात्र वाहन जाताच रस्ता उकरला जाऊ लागला. रस्ता उकरल्याचे दिसून येताच सावळा गोंधळ पुढे आला. चक्क हाताने रस्ता उकरला गेला.
रात्रीतून चालला खेळ
रस्ता हाताने उकरत असल्याने या कामात झालेला भ्रष्टाचार उघड झाला. डांबरीकरण करताना कंत्राटदाराकडून कोणत्याही नियमाचे पालन केले गेले नाही. रस्त्यावरील धूळ, माती झाडण्यात आली नाही. त्यावरच वरवरून डांबरीकरण करण्यात आल्याचे दिसून येत आहे. याशिवाय रस्त्याचे काम करताना संबंधित विभागाचे कुठलेही अधिकारी उपस्थित नव्हते. कंत्राटदाराने मनमानी पध्दतीने काम केले. झालेल्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी स्थानिकांद्वारे करण्यात आली आहे. सुभाष कुळमते, खुशाल सुरपाम, संदीप खाटे, गणेश झाडे, ओम रवी घराटे, विष्णू पुसनाके, ईश्वर खाटे, प्रशांत आडे, प्रकाश नारनवरे, उमेश कुडमते आदींनी ही मागणी लावून धरली आहे. यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.
ग्रामस्थ नाराज
गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची मागणी होती. वारंवार रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा सुरू होता. रस्ता पूर्ण डांबरी होईल असे वाटत होते. परंतु तसे झाले नाही. थातुरमातुर पद्धतीने रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. त्यामुळेच वाहने जाणे सुरू होताच रस्ता उखडला. या कामात किती डांबर वापरण्यात आले, हे देखील कुणाला ठाऊक नाही. डांबर वापरले की नाही याचा देखील पत्ता नाही. त्यामुळे गावकरी आता संतापले आहेत.