महाराष्ट्र

Buldhana Constituency : महायुतीच्या विजयाचा चौकार की मविआची एन्ट्री?

Lok Sabha Result : विजयाचे दावे-प्रतिदावे जोरात 

Politics News : बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. निकालाला अवघे काही तास उरले आहेत. या निवडणुकीत बुलढाण्यातून उत्सुकता वाढली आहे. सलग चौथ्यांदा विजयी होण्याचा विक्रम महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव विक्रम करतात, की महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर विजयी होतात ही उत्कंठा आहे. खेडेकर विजयी झाल्यास महाविकास आघाडीची बुलढाण्यात पुन्हा एन्ट्री होऊ शकते. याबाबत सध्या उत्सुकता आहे. 

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा संधी देण्यात आली तर महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रा.नरेंद्र खेडेकर यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिंदेसेना विरुद्ध ठाकरे सेना असा थेट सामना रंगला होता.

बुलढाणा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. 1996 पासून ते 2019 पर्यंत येथे भगवा फडकला. 1998 चा अपवाद वगळता येथून शिवसेना विजयी होत आली आहे. बुलढाणा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. तेव्हा आनंदराव अडसूळ तीनवेळा खासदार होते. 2009 पासून या मतदारसंघात खुल्या प्रवर्गातून प्रतापराव जाधव सलग तीनदा विजयी झाले आहेत.

यंदा मोठी चूरस 

महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी सलग तीन वेळा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविला. 2019 मध्ये त्यांनी हा विक्रम मोडला. काँग्रेसच्या शिवराम राणे हे यापूर्वी 1957, 1962 आणि 1967 मध्ये विजयी झाले होते. आता 2024 मध्ये चौथ्यांदा जाधव विजयी होत राणेंचा विक्रम मोडीत काढतात का, हे पाहण्यासारखे आहे. यावर राजकीय वर्तुळात काथ्याकूट सुरू आहे. महाविकास आघाडीचे प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या समर्थकांनाही ते महायुतीचा बुलढाण्यातील विजयाचा फुगा फोडतील अशी आशा आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत 2024 मधील निवडणुकीत 1.5 टक्क्यांनी मतदान कमी झाले आहे. त्यामुळे हे मतदान आपल्या पथ्यावर पडले, अशी आशा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आहे.

Buldhana Constituency : 142 फेऱ्यांनंतर कळणार नव्या खासदाराचे नाव

कोण आहेत नरेंद्र खेडेकर?

बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे प्रा.नरेंद्र खेडेकर हे आघाडीचे उमेदवार आहेत. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख असलेले नरेंद्र खेडेकर यांचे नाव यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. शिवसेनेने निष्ठा या निकषावर त्यांची निवड केली. खेडेकर हे ते पहिल्यांदाच मोठ्या लढतीत उतरले आहेत. चिखली विधानसभामध्ये उमेदवारीने त्यांना हुलकावणी दिलेली आहे. आता लागणाऱ्या निकालात महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या रूपाने महाविकास आघाडीची बुलढाण्यात पुन्हा एन्ट्री होते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बुलढाणा लोकसभेसाठी 26 एप्रिल रोजी 17 लाख 82 हजार 700 मतदारांपैकी 11 लाख 5 हजार 761 जणांनी मतदान केले. निवडणूक रिंगणामध्ये उभे असलेल्या 11 पक्षांच्या आणि 10 अपक्षांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. आता 4 जून रोजी जेव्हा प्रत्यक्षात मतमोजणी सुरू होईल तेव्हाच बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मतदारांनी कोणाला कौल दिला, हे स्पष्ट होईल.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!