Political Battle : बुलढाणा लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीतील मतमोजणीचा निकाल 4 जूनला जाहीर होणार आहे. त्यासाठी बुलढाणा प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. एकूण 142 फेऱ्यांनंतर बुलढाणा मतदारसंघाच्या नव्या खासदाराचे नाव जाहीर होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाकडून 1 हजार 600 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभेसाठी झालेल्या मतदानाचा निकाल 4 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा निकालही मंगळवारी जाहीर करण्यात येईल. शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्था, मलकापूर रोड, बुलढाणा येथे सकाळी 8 वाजतापासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. मतमोजणीची प्रशासनाकडून जय्यत तयारी झाली आहे. मतमोजणीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी 14 टेबल राहणार आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यासाठी 84 टेबल राहणार आहेत.
अधिकाऱ्यांची नियुक्ती
प्रत्येक टेचलवर तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये मोजणी पर्यवेक्षक आहेत. टेबलवर मशिन्स पोहोचती करण्यासाठी टेबलनिहाय एक कोतवाल कर्मचारी आहे. सहाही विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण 142 फेऱ्या होतील. या फेऱ्यांनंतर निकाल दिला जाईल. मोजणी सहायक आणि सूक्ष्म निरीक्षक देखील राहणार आहेत. प्रत्येक मतदारसंघासाठी फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
Bhandara Gondia : उत्कंठा शिगेला ! कोणाला पोचपावती, कोण देईल गिफ्ट?
सर्वाधिक फेऱ्या मेहेकरात
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 25 फेऱ्या मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी राहणार आहेत. त्यानंतर सिंदखेडराजा, बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 24 फेऱ्या होतील. खामगाव, जळगाव जामोद आणि चिखलीसाठी प्रत्येकी 23 फेऱ्या राहणार आहेत. मतमोजणी हॉलमध्ये पारदर्शक काम व्हावे यासाठी काटोकोरपणे नियम आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य सचिव सुमित मुखर्जी यांनी नियमानुसार आदेश जारी केले आहेत. काऊंटिंग हॉलमध्ये फक्त तीन जणांना त्यांचा मोबाईल सुरू ठेवता येतील.
इलेक्ट्रॉनिकली ट्रांसमिटेड बॅलट पेपर सिस्टमच्या मतांच्या मोजणीसाठी वन टाईम पासवर्ड आहे. त्यासाठी ओटीपीची गरज लागते. हा ओटीपी मोबाईलवर पाठवला जातो. त्यामुळे आयोगाने आरओ, एआरओ आणि काऊंटिंग सुपरवायझरलाच मोबाईल ठेवण्याची परवानगी दिली आहे. तीन अधिकाऱ्यांनाच मोबाईल जवळ ठेवता येईल.मोबाईलमध्ये काय करावे आणि काय करु नये, याविषयी माहिती असेल. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किती केंद्रांवर मोबाईलचा वापर झाला आणि त्यांचे नंबर काय होते, याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी जमा करतील. याबाबतचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.