Political News : लोकसभा निवडणूक निकालाचे ‘काउंटडाऊन’ सुरू झाले आहे. आता केवळ काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. मतमोजणीचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतशी उत्सुकताही वाढत आहे. निकालाला घेऊन उमेदवारांत अस्वस्थता वाढली आहे. निकालाचा विषय घेऊन राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्त्यांकडून विजयाच्या समीकरणाची आकडेमोड केली जात आहे. सट्टाबाजारातही निकालाला घेऊन वेगाने उलाढाल होत आहे.
भंडारा-गोंदिया मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण 12 लाख 24 हजार 956 मतदारांनी आपला कौल दिला. या मतदारसंघातून एकूण 18 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे खासदार सुनील मेंढे आणि काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे यांच्यातच थेट लढत आहे. सहाही विधानसभा मतदारसंघांत झालेली मतदानाची टक्केवारी पाहता, विजयाची लढत ही चुरशीची होणार आहे.
निकाल 21 फेऱ्यानंतर
भंडारा-गोंदिया मतदारसंघात 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात निवडणूक पार पडली. त्यानंतर, तब्बल दीड महिन्याच्या कालावधीनंतर4 जून रोजी पलोडी येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या 105 टेबलांवरून एकूण 21 फेऱ्या होणार आहेत. 21व्या फेरीत भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण, हे निश्चित होणार आहे.
मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुनील मेंढे आणि काँग्रेसचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्यात मुख्य लढत आहे. भाजपचे उमेदवार सुनील मेंढे आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यावर सर्वाधिक शर्यती लावल्या जात आहेत. बसपा, वंचित आणि अपक्ष उमेदवार किती मतांचे विभाजन करतात. सर्वाधिक मतदान झालेल्या साकोली, अर्जुनी मोरगाव मतदारसंघाचा कौल कुणाला जातो. यावर विजयाचे गणित ठरणार आहे. यंदा निवडणुकीत विजयी होणारा उमेदवार 20 ते 25 हजार मतांनी विजयी होईल, असे जिल्ह्यातील जाणकार सांगत आहेत.
अशी होणार मतमोजणी
प्रत्येक टेबलवर एक निवडणूक अधिकारी असेल. याशिवाय उमेदवार आणि त्या त्या पक्षाचा एक सदस्य असेल. उमेदवाराने EVM हात लावू नये यासाठी एक बरिकेट्स असतात. सर्वांत आधी पोस्टल मतांची मोजणी होणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने EVM मतांची मोजणी सुरू होईल. EVM सुरू करण्याआधी त्याच्या सीलची तपासणी केले जाते. EVM सोबत कोणतीही छेडछाड तर झाली नाही ना? याची तपासणी मतमोजणी अधिकारी करून घेतील.
प्रत्येक फेरीत होणाऱ्या मतमोजणीची आकडेवारी राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला सांगण्यात येते. ही प्रक्रिया जोपर्यंत मतमोजणी पूर्ण होत नाही तोपर्यंत चालत राहते. शेवटी ज्या उमेदवाराला जास्त मते मिळाली अशा उमेदवाराला विजयाचे प्रमाणपत्र देऊन निवडणूक अधिकारी त्याला विजय घोषित केले जाते.