Lok Sabha : एक जूनला देशातले सातव्या टप्प्याचे मतदान झाले. 2024 मधील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानंतर लक्ष आहे ते 4 जूनला होणारी मतमोजणी आणि निकालाकडे. भंडारा जिल्हा प्रशासनाने मतमोजणीसाठी तयारी पूर्ण केली आहे. या तयारीबाबत आता पक्षाचे सुद्धा टेंशन पहायला मिळत आहे. मतमोजणीचा काही कार्यकर्त्यांना अनुभव आहे. अशा कार्यकर्त्यांना मतमोजणी प्रतिनिधी म्हणून उमेदवारांनी प्राधान्य दिले आहे.
नव्या फळीतील दमाच्या आणि अभ्यासू कार्यकर्त्यांनाही मतमोजणीसाठी प्रतिनिधी म्हणून जबाबदारी दिली आहे. आता चार जूनच्या निकालाची प्रतीक्षा आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात 18 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी राष्ट्रीय आणि राज्याच्या अधिकृत पक्षाचे तीन, नोंदणीकृत राजकीय पक्षाचे (राष्ट्रीय व राज्याचे अधिकृत) चार आणि अपक्ष 11 अशा 18 उमेदवारांचा समावेश आहे. अनेक उमेदवारांची लढत काट्याची मानली जात आहे. होणारी मत विभागणी ही महत्त्वाची ठरणार आहे.
अधिकाऱ्यांच्या सूचना
मतमोजणी केंद्रावर अनुभवी उमेदवारांची यंत्रणा उभारण्यात आली आहे .गोंधळाची परिस्थिती टळावी यासाठी यंत्रणांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. 105 टेबलाची सोयी करण्यात आली आहे. मतमोजणी प्रतिनिधींना सकाळी 6: 30 दरम्यान पोहोचून 8 वाजता प्रक्रिया सुरू करता येणार आहे. केंद्रावर हजर राहण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. मतमोजणी भंडारा शहराजवळील पलाडी येथील स्ट्रांग रूम परिसरात होणार आहे.
परिसरात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कलम 144 लागू केला आहे. परिसरातील कोणत्याही सार्वजनिक अथवा खाजगी जागेमध्ये कुठलीही कृती करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. परीसरात हॉटेल, टेलिफोन बूथ, झेरॉक्स मशीन, फेरीवाले यांना व्यवसाय करता येणार नाही. लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) रणधुमाळीला पूर्व विदर्भापासून (East Vidarbha) सुरुवात झाली होती. यंदा भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारासंघात चुरशीची लढत होणार आहे.
काँग्रेसच्या (Congress) डॉ. प्रशांत पडोळे (Prashant Padole) यांना मैदानात उतरवले. भाजपने जुनाच चेहरा कायम ठेवत विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली. आता त्यांचा निकाल मतमोजणीतून लागणार आहे. एकूण 21 फेऱ्या 105 टेबलवरून होणार आहेत. मतदान झाल्यानंतर EVM सील मारून त्याला एका स्टोअर रूममध्ये ठेवण्यात आले होते. निकालाचा दिवस असतो तेव्हा ती मशीन स्टोअर रूममधून बाहेर काढण्यात येते. मतमोजणी करत असताना एका वेळी फक्त 14 EVM मशीनचीच मोजणी केली जाते.